भाषा संवर्धन पंधरवडा

दिनांक: १३ मे, २०१५

भारती निवास सोसायटी च्या बालरंजन केंद्रात भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. यात ३ ते ६ वयोगटासाठी “पुस्तकांच्या राज्यात ” हे तीन दिवसांचे शिबीर घेण्यात आले. यात सौ आरती कान्हेरे यांनी मुलांना दाखवायला भरपूर चित्रांची पुस्तके आणली होती . प्रत्येक मुलाला स्वतंत्र पुस्तक देऊन ते बघायला सांगितले .नंतर त्यांना काय समजले हे मुलांकडून काढून घेतले. गोष्टीनंतर त्याच्याशी संबंधित गाणे मुलांनी गायले. तसेच पपेट्स  वापरून मुलांनी ऐकलेली गोष्ट सादर केली.  आरती ताईनी मग त्यांना चित्रावरून गोष्ट सांगितली. पतंगाची करामत ही गोष्ट ऐकून सर्व मुलांनी चित्रे काढली. ‘पालकांनी स्वतःही मुलांसमवेत वाचले पाहिजे. मुलांनी काय वाचलेय ते त्यात रस घेऊन ऐकले पाहिजे’ असे त्या म्हणाल्या.

बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या की “मुलांनी केलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल बक्षीस द्यायचे असेल तर पुस्तकच द्या. त्यात खूप चित्र असू द्या. त्यामुळे मुले वाचती होतील आणि त्यांचा पुस्तकांचा संग्रह वाढेल. नुसता टीव्ही पाहण्यापेक्षा वाचनाने मुले विचार करू लागतात”.

ह्याच शृंखलेतील पुढचा कार्यक्रम ६ ते १० वयोगटासाठी होता. ‘पुस्तकं वाचूया गमतीने’ या कार्यक्रमात प्रथम बुक्सच्या संपादिका संध्या टाकसाळे यांनी मार्गदर्शन केले. “मुलांसाठी भाषा सोपी हवी पण रटाळ नको. नादमय भाषा मुलांना आवडते. मुलांना पुस्तके वाचायला देताना पालकांनी त्यांच्या वयाप्रमाणे निवड करून मुलांच्या हाती पुस्तके द्यायला हवीत. प्रत्येक पुस्तक मुलाला मातृभाषेतून वाचायला मिळायला हवे. म्हणून प्रथम बुक्स सारखी संस्था ११ भारतीय भाषांतून पुस्तके प्रकाशित करते” असे त्या म्हणाल्या. “वाचनाबरोबरच गोष्टी, खेळ आणि नाटक यातूनही भाषाकौशल्य वाढीस लागते” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ह्या मालिकेतील तिसरा कार्यक्रम ११ ते १७ या वयोगटासाठी होता. सौ.मनीषा पाठक यांनी ‘मुलांना परदेशी भाषा शिक्षणाचे महत्व’ समजावून सांगितले. भविष्य काळात जपानी, चीनी, स्पानिश, जर्मन, फ्रेंच अशी एखादी परदेशी भाषा शिकलेल्या मुलांना करीयरच्या उत्तम संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. चीनी आणि जपानी ह्या चित्रमय भाषा असल्यामुळे लहान मुले त्या उत्तम प्रकारे ग्रहण करू शकतात असेही सौ.पाठक म्हणाल्या.

‘भाषा संवर्धन पंधरवड्याच्या’ निमित्ताने बालरंजन केंद्राने ३ ते १७ अशा सर्व वयातल्या मुलांसाठी कार्यक्रम आयोजित करून मुलांना भाषेची गोडी लावण्याचा प्रयत्न केला.

परदेशी-भाषा-शिक्षणाचे-महत्व-जाणून-घेताना-बालरंजन-केंद्रातील-श्रोतृवर्ग

परदेशी-भाषा-शिक्षणाचे-महत्व-जाणून-घेताना-बालरंजन-केंद्रातील-श्रोतृवर्ग

परदेशी-भाषा-शिक्षणाचे-महत्व-सौ-मनीषा-पाठक

परदेशी-भाषा-शिक्षणाचे-महत्व-सौ-मनीषा-पाठक

पुस्तके-वाचूया-गमतीने-या-सत्रात-बोलताना-संध्या-टाकसाळे

पुस्तके-वाचूया-गमतीने-या-सत्रात-बोलताना-संध्या-टाकसाळे

पपेट्स-द्वारे-गोष्टीचे-सादरीकरण-करताना-आरती-कान्हेरे-व-बालचमू

पपेट्स-द्वारे-गोष्टीचे-सादरीकरण-करताना-आरती-कान्हेरे-व-बालचमू