बालरंजन केंद्राचा बक्षीससमारंभ

दिनांक: ३० जानेवारी, २०१९

बालरंजन केंद्राच्या वार्षिक गंमत स्पर्धांचा बक्षीससमारंभ बुलडाणा अर्बन बँकेचे सीईओ श्री. शिरीष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. ते बालरंजनचा विद्यार्थी सश्रिकचे आजोबा असल्याने त्यांनी एक छानशी गोष्टच मुलांना सांगितली. एकमेकांना मदत करणाऱ्या चार मित्रांची गोष्ट मुलांना आवडली.

‘टीव्हीपासून दूर रहा आणि मैदानावर खेळते रहा’ असा संदेश त्यांनी मुलांना दिला. पालकांनी मुलांना जास्तीतजास्त वेळ द्यावा. मुलांना विषय नीट समजण्यासाठी त्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे असे श्री. देशपांडे यांनी पालकांशी बोलताना सांगितले.

बालरंजनच्या संचालिका व नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी “ आनंदी बालपणाचे “ महत्व उपस्थितांना सांगितले. “दुसर्याला मदत करण्याची एकही संधी सोडू नका. याने तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्ही सर्वांचे लाडके व्हाल.( हवेहवेसे )”असे माधुरीताई बालगोपालांना म्हणाल्या.

यावेळी केंद्राच्या उल्लेखनीय यश मिळविलेल्या माजी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. कॉर्पोरेट लॉं हा विषय शिकविणार्या तसेच लहान वयात या विषयावर दोन पुस्तके लिहीणाऱ्या गौरव पिंगळे याचा, टेनिसपटू सालसा आहेर हिचा व परीक्षापे चर्चा या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात एक लाख विद्यार्थ्यांमधून पुणे शहरातील केवळ एकाच मुलाच्या निबंधाची निवड झाली तो अथर्व भट या विद्यार्थ्याचे टाळ्यांच्या  कडकडाटात उपस्थितांनी कौतुक केले. प्रज्ञा गोवईकर यांनी दृक्श्राव्य पद्धतीने वर्षभराचा अहवाल सादर केला आणि आनंदक्षणांची उजळणी केली. मंजिरी पेठे यांनी सूत्रसंचालन केले. तर किशोरी कुलकर्णी यांनी बक्षिसाच्या नावांचे वाचन केले. आई,बाबा,आजी,आजोबा गटातील स्पर्धक बक्षिसे घेताना मुले आनंदित झाली. अशाप्रकारे मुलांसाठी आनंदाची निर्मिती व त्याची देवाणघेवाण करताना ३१ वे वर्ष कसे संपले ते कोणालाच समजले नाही. 

बुलडाणा अर्बन बँकेचे सीईओ श्री. शिरीष देशपांडे

बुलडाणा अर्बन बँकेचे सीईओ श्री. शिरीष देशपांडे

 

बालरंजन केंद्राचा बक्षीससमारंभ

बालरंजन केंद्राचा बक्षीससमारंभ