अवयवदानाने नवसंजीवनी

दिनांक: १२ फेब्रुवारी, २०१९

अवयवदानात पुणे अग्रेसर : डॉ.पळणीटकर यांचे प्रतिपादन

बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी ‘अवयवदान- एक सामाजिक गरज’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. डॉ.सचिन पळणीटकर यांनी अतिशय सोप्या भाषेत, दृक्श्राव्य माध्यमातून हा विषय स्पष्ट केले. ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील लिव्हर ट्रान्सप्लान्ट तज्ञ आहेत.

डॉ. पळणीटकर म्हणाले,”एका ब्रेनडेड व्यक्तीचे ८ अवयव परत वापरण्यासाठी उपयोगी पडू शकतात. यकृत, हृदय, फुफुसे,डोळे,मूत्रपिंड,त्वचा,यासह टिशू व टेनडनचेही प्रत्यारोपण करता येते. हृदय २ तासात तर लिव्हर ५ ते ६ तासात प्रत्यारोपित करावे लागते. दान म्हणून मिळालेल्या अवयवांच्या विविध तपासण्या कराव्या लागतात. मुख्य म्हणजे ही सुविधा २४ तास उपलब्ध असावी लागते. अवयव हवे असणार्या रुग्णांची प्रतीक्षायादी नेहमीच मोठी असते आणि मिळणारे अवयव कमी असतात. टीमवर्कने हे काम पार पाडावे लागते.”

“२०१४ साली गॅॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्यापासून ह्या विषयाला सरकारमान्यता मिळाली. पुणे शहर या विषयात आघाडीवर असून अवयव प्रत्यारोपण करणारी ७ केंद्रे पुण्यात आहेत. गेल्या ४ वर्षात महाराष्ट्रात पुणे शहरातून जास्तीतजास्त अवयवदान झाले आहे. सध्या हे उपचार जरी खर्चिक असले तरी भविष्यात हा खर्च कमी होऊ शकेल.” असेही ते म्हणाले.

नगरसेविका आणि संचालिका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या,” अवयवदानाबाबत कुटुंबाचा पाठिंबा फार महत्वाचा असतो. त्यामुळेच या विषयाबाबत, मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. त्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अपघातात ब्रेनडेड झालेल्या पेशंटच्या बाबत विचार करताना नातेवाईकांनी अवयवदानाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. अतिशय कमी वेळात निर्णय घेऊन, त्वरेने कृती करण्याची याकामी गरज असते.”

अवयवदानाचा प्रसार करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल खाडिलकर यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. प्रज्ञा गोवईकर यांनी आभारप्रदर्शन केले.

अवयवदानाने नवसंजीवनी - डॉ.सचिन पळणीटकर

अवयवदानाने नवसंजीवनी – डॉ.सचिन पळणीटकर