दिनांक: २७ फेब्रुवारी, २०१९
डेक्कनक़्विनला ग्रीन सिग्नल मिळाला आणि ती वेगात धावू लागल्यावर मुलांनी पिटल्या. हे चित्र होते बालरंजन केंद्रातील मोडेल रेल्वे प्रदर्शनाचे. भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात विज्ञानदिनानिमित्त श्री. सुहास दिक्षित यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
झुकझुकगाडीचा हुबेहूब आवाज, इंजिनाची शिट्टी, सिमेंटचा फलाट, तेथील तीन भाषांतील उद्घोषणा, डमी वॅॅगन व इतर वॅॅगनसह धावणारी मालगाडी,डिझेलवरची गाडी, इलेक्ट्रिकवरची गाडी याची माहिती मुलांनी घेतली. शंटिंग सिग्नल मिळताच गाडीला जावून जोडणारे इंजिन या सगळ्या गोष्टी पाहून मुले अचंबित झाली. धुरांच्या रेषा हवेत काढणारे इंजिन आणि देखणी डेक्कन क़्विन हे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले.
यावेळी बोलताना नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या,” याच दीक्षित काकांचे पहिलेवहिले प्रदर्शन इथेच भरले होते. त्यावेळी तुम्हा मुलांचा जन्मही झाला नव्हता. पण त्यावेळी जी मुले तुमच्या एव्हढी होती त्यांना हे प्रदर्शन असेच खूप आवडले होते. आता त्यात अनेक नवीन गोष्टींची भर पडली आहे. सुहास काकांनी हा छंद गेली २० वर्षे जपला. त्यांचे हे कार्य अभिनंदनीय आहे.”
रेल्वेच्या बारीक बारीक यंत्रणामागील विज्ञान मुलांनी जाणून घेतले. त्यांनी सुहास काकांना प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. सुमारे ४०० मुले आणि १०० पालकांनी या प्रदर्शनाचा आनंद घेतला. लता दामले व दीप्ती कौलगुड यांनी आयोजनात सहाय्य केले.