बालरंजन केंद्रात मराठी भाषादिन साजरा

दिनांक: २७ फेब्रुवारी, २०१९

 
मायमराठीच्या संवर्धनासाठी बालरंजन केंद्रात गेली ३१ वर्षे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी राजभाषा दिनानिमित्त संचालिका व मनपातील मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य माधुरी सहस्रबुद्धे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 
यावेळी बोलताना माधुरीताई म्हणाल्या,” इंग्रजी जरी आपली ज्ञानभाषा असली तरी मराठी ही आपली मातृभाषा आहे. ती टिकवायची असेल तर घरात आपण मुलांशी आणि एकमेकांशी मराठीत बोलले पाहिजे. हे वर्ष ‘ आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष ‘ आहे. या वर्षात आपल्या मराठी भाषेचे जतन व संवर्धन करूया.”
 
 यानंतर बालसाहित्यिक श्री. संजय ऐलवाड यांनी मुलांशी संवाद साधला. त्यांनी गटानुसार मुलांना त्यांच्या कविता सांगितल्या.उंदीर, चांदोमामा, पाऊस, जंगलातील शाळा या कविता मुलांना आवडल्या. मग पहिली ते चौथीच्या गटाला ‘ भित्रा थेंब ‘ ही गोष्ट संजयकाकांनी सांगितली.
 
केंद्रातील बास्केट बाल गटाच्या मुलांना श्री. ऐलवाड यांनी मराठी भाषेचे महत्व सांगितले. भाषेबरोबरच भावना जपण्याचा सल्ला दिला. एकीकडे प्रगती करीत असताना आपण यंत्र बनत 
चाललो आहोत याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. भाषा आणि भावना जपल्या तर वृद्धाश्रमांची संख्या वाढणार नाही असेही ते म्हणाले. या मुलांना त्यांनी ‘ यशाचा मार्ग ‘ ही गोष्ट सांगितली.
 
लता गोडबोले यांनी प्रास्ताविक केले तर रुपाली वैद्य यांनी आभार मानले.
 
श्री. संजय ऐलवाड व सौ.माधुरी सहस्रबुद्धे

श्री. संजय ऐलवाड व सौ.माधुरी सहस्रबुद्धे