पक्ष्यांच्या अदभूत दुनियेत

दिनांक: १६ फेब्रुवारी, २०१८ 

श्री. किरण पुरंदरे म्हणजे पक्ष्यांचा चालता बोलता ज्ञानकोश ! त्यांच्याकडून पक्ष्यांच्या गमतीजमती ऐकणे ही मुलांसाठीच काय पण मोठ्यांसाठीही आनंदाची पर्वणी ! ! भारती निवास सोसायटीच्या ३१ व्या वर्षाचा प्रारंभ किकाच्या कार्यक्रमाने जोरदार झाला. पालक व मुलांच्या तुडुंब गर्दीत ह्या स्लाईड शो ला सुरुवात झाली.

 “किरण पुरंदरे हे ७० भारतीय पक्ष्यांचे आवाज काढू शकतात आणि त्यांच्याकडे त्यांच्या ५००० हून अधिक स्लाईडस आहेत ” असे संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सुरुवातीलाच सांगितले.त्यामुळे उपस्थितांना त्यांच्या अभ्यासाची कल्पना आली.

किरण काका म्हणाले,” पुणे शहर आणि परिसरात सुमारे ३५० पक्षी दिसतात.महाराष्ट्रात ५६०, भारतात १३०० जातींचे तर जगात १०,००० जातींचे पक्षी दिसतात.काही पक्ष्यांना उडता येते तर काहींना येत नाही.पक्षी जेवढा आकाराने मोठा तेवढा तो जास्त जगतो.लहान पक्षी कमी जगतो.काकाकुवा ११० वर्षे,घुबड ६८ , गिधाड ५२, मोर २० तर चिमणी ८ वर्षे जगते.’यलो फुटेड ग्रीन पिजन’हा महाराष्ट्राचा पक्षी असून तो अंजिरासारखी फळे खातो.”

” ज्या पक्ष्याच्या पायाचे मधले बोट मोठे असते, तो जोरात पळू शकतो. सगळे पक्षी रोज अंघोळ करतात” असे किरण पुरंदरे यांनी आवर्जून मुलांना सांगितले.” पाऊस जवळ आला कि पावश्या ‘ पेरते व्हा ‘ असा संदेश देतो.गरुड विषारी साप मारून खातो आणि ते विष पचवूही शकतो.निशाचर पक्ष्यांचे डोळे मोठे असतात.” अशा रंजक गोष्टी त्यांनी मुलांना सांगितल्या.त्यानंतर त्यांनी विविध पक्ष्यांचे आवाज काढले. त्यांची जुगलबंदीही आईकावली. त्यात मुलांबरोबर मोठेही गुंगून गेले. प्रज्ञा गोवईकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दाऊद सुतार यांनी पारदर्शिका दाखविल्या.माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. यावेळी अनघा पुरंदरे उपस्थित होत्या.

श्री. किरण पुरंदरे व सौ. माधुरी सहस्रबुद्धे

श्री. किरण पुरंदरे व सौ. माधुरी सहस्रबुद्धे

 

श्री. किरण पुरंदरे

श्री. किरण पुरंदरे