दिनांक: १९ मे, २०१८
बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाचं हे २८ वं वर्ष सुरु झालं. नवीन वर्षाची सुरुवात उन्हाळी सुटीतील १५ दिवसीय नाट्यशिबिराने झाली.” आपल्या मुलामुलींना नाट्य विषयाची आवड आहे का ? ते पाहण्यासाठी हे छोटे शिबीर उपयुक्त ठरते.” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी पालकांना सांगितले.
नाट्यवर्गाचे मार्गदर्शक श्री. देवेंद्र भिडे यांनी शिबिराबाबत मनोगत व्यक्त केले. ” मुलांना मराठी गोष्टी वाचू द्या. कारण कथेवरून पटकथा तयार होते. कथावाचन करतानाच त्यापासून संवाद कसे तयार होतात हे या शिबिरात आम्ही मुलांकडून करून घेतले.मराठी साहित्य या बालकलाकारांपर्यंत पोहोचावे ही त्यामागील भूमिका आहे.” असे ते म्हणाले.
” नाटक करताना चुकत चुकत शिकणे व शिकताना आनंद मिळविणे ही गोष्ट अविस्मरणीय आहे.मुलांमधील उर्जा सकारात्मकतेने वापरून घेणे महत्वाचे असते.हे काम सातत्याने करणाऱ्या बालरंजनच्या कार्याला सलाम ! ” असे उद्गार किशोर मासिकाचे संपादक श्री. किरण केंद्रे यांनी काढले. नाट्यशिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
श्री. किरण केंद्रे यांनी माधुरीताईंना ‘ बालभारतीचा इतिहास ‘ हे पुस्तक भेट दिले. श्री. केंद्रे यांच्या हस्ते शिबिरार्थीना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.
यावेळी मुलांनी एक नाटुकले सादर करून अभिनयाची चुणूक दाखवली. सीमा अंबिके यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर दीप्ती कौलगुड यांनी आभार मानले.