‘छोटे झाले मोठे’

दिनांक: १२ मे, २०१८

“सामाजिक संदेश पोहोचविण्यासाठी चित्रपटासारखे माध्यम नाही  हे क्षेत्र वाईट नक्कीच नाही मात्र अनिश्चित आहे.त्यामुळे प्रथम अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, शिक्षण हाताशी असू द्या.” असे डॉ.आनंद जोशी  यांनी मुलांना सांगितले.
 
भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात ‘छोटे झाले मोठे’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ऋग्वेद शेंडे व रेवती देशपांडे या दोघांनी त्यांची मुलाखत घेतली. ती उत्तरोत्तर रंगत गेली. सुरुवातीसच आनंद जोशी यांनी मुलांवरचा ताण हलका केला. मग मनमोकळ्या गप्पा सहकार सदन मध्ये रंगल्या.
 
संवाद पुणे व बालरंजन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालरंजन  केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.श्री. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. बालचित्रपट महोत्सवाबद्दल बोलताना ते म्हणाले,” तीन पिढ्यांना जोडणारे चित्रपट म्हणजे श्यामची आई व बालशिवाजी.या चित्रपटांना नेहमीच पालकांची पसंती असते.” 
 
” मी पाचवी ते नववी श्री.आण्णा व सौ. अनिता राजगुरू यांच्या शिशुरंजन संस्थेत जात होतो. तेथे नाट्य संस्कार झाले. शाळेतून हिंदी,इंग्रजी व संस्कृत भाषांमधील नाट्यवाचन स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात बक्षीस मिळाल्याची बातमी वृत्तपत्रात आली.आणि बालशिवाजीची भूमिका घरी चालत आली. 
 
‘भूमिकेसाठी काय तयारी केली?’ या प्रश्नाला उत्तर देताना आनंद याने ,”मला घोड्याची खूप भीती वाटत असताना मी घोडेस्वारी शिकलो. दांडपट्टा, तलवारबाजीचे शिक्षण कोल्हापूरला यादव सरांकडे घेतले. ३५ वर्षांपूर्वी ‘बाल शिवाजी’ हा सिनेमा प्रभात टोकिजला लागला व सलग ३५ आठवडे चालला. या सिनेमाने मला सेलिब्रिटी बनविले. पण हे सेलिब्रिटीपण पचविणे अवघड असते” असे ते म्हणाले. कोल्हापूरला चाललेल्या शुटींगच्या दरम्यान रात्री दीड वाजता भालजी पेंढारकरांच्या पायाशी बसून स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘शूर आम्ही सरदार’ हे गाणे ऐकण्याचं भाग्य, तसेच, उषा चव्हाण यांनी घारगे, शिरा, असा घरून करून आणलेला खाऊ मिळाल्यामुळे झालेले लाड अश्या आठवणीही जागवल्या. 
 
यावेळी, निकिता मोघे, डॉ.सुभाष काळे, सुमन शिरवटकर आदी उपस्थित होते.
 
संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी डॉ.आनंद जोशी यांना स्मृतीचिन्ह देऊन आभारप्रदर्शन केले.
 
'छोटे झाले मोठे'

‘छोटे झाले मोठे’