नदीचे गतवैभव परत मिळवूया

दिनांक: १२ ऑगस्ट, २०१८

” आजमितीला मुळा-मुठा नद्या मृतावस्थेस जाऊन पोहोचल्या आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करून त्यांना जिवंत करणे हे आपण सगळ्यांनी मिळून करायचे काम आहे.जेव्हापासून आपल्या घरात नळाने पाणी यायला लागले तेव्हापासून आपला नदीशी असलेला संपर्क तुटला. तिची काळजी घ्यायचे आपण विसरून गेलो.” असे प्रतिपादन आदिती देवधर यांनी केले. भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रातील मुले व पालकांशी त्या बोलत होत्या.

‘आपल्या मुठा नदीची गोष्ट ‘ त्या सांगत होत्या.आपल्या नदीचे वय अंदाजे एक कोटी वर्ष आहे. पूर्वी या नदीकाठी डायनासोर, हत्ती, शहामृगही होते हे ऐकून मुले आश्चर्यचकित झाली. मुठेच्या काठी वस्ती झाली ती सुमारे १२०० वर्षांपूर्वी.असेही त्यांनी सांगितले. आदिती देवधर यांनी अतिशय रंजक माहिती स्लाईडस च्या माध्यमातून दिली.

कवड्या, नदीसुरय व पाणमयूर किंवा कमलपक्षी नदीवर आढळले तर नदीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे. नदीत पुरेसा प्राणवायू असेल तर तेथील अन्नसाखळी चालू राहते. अशी नदी जिवंत नदी समजली जाते.नदीवर कावळे,घार असे पक्षी दिसले तर तेथे बराच कचरा आहे असे समजावे.

वेगवे येथे मुठा नदी उगम पावते. तेथे ती स्वच्छ असते. पुढे जाताना ती अस्वच्छ होत जाते.असेही त्या म्हणाल्या.माणशी दररोज ४० ग्राम केमिकल्स आपण वापरतो. पुण्याच्या लोकसंख्येचा विचार केला तर रोज २ लाख किलो असे हे प्रमाण असल्याचे त्यांनी सांगितले.

“आपली नदी स्वच्छच रहावी म्हणून आपण त्यात कचरा पडू देता कामा नये. यासाठी तुम्ही मुलांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे.” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.

लता दामले यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर मुलांना आणि ताईंना, पर्यावरणस्नेही कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या.

अदिती देवधर यांचा सत्कार करताना माधुरी सहस्रबुद्धे

अदिती देवधर यांचा सत्कार करताना माधुरी सहस्रबुद्धे