दिनांक: ३१ जानेवारी, २०१८
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बालरंजन केंद्रात ‘ छोट्यांचे विंदा ‘हा कार्यक्रम सादर करण्यात आला. बालरंजनच्या नाट्यवर्गातील मुलांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले.राणी पारसनीस यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले होते.प्रमुख पाहुणे म्हणून विंदांची मुलगी सौ. जयश्री काळे,जावई श्री.विश्वास काळे, मुलगा डॉ.आनंद करंदीकर उपस्थित होते.
मुलांनी ‘ परी ग परी ‘,जर तर ची गंमत , एटू लोकांचा देश,’बकासुराचे जेवण’,’सुट्टी मिळण्याचा मंत्र’ , ‘बागुलबुवा’ असे करत करत ‘ पिशी मावशी’ पर्यंत कवितांची गाडी जाऊन पोहोचली.मोजकेच सूचक नेपथ्य, नेटकी प्रकाशयोजना,मुलांचे स्पष्ट शब्दोच्चार, उत्तम अभिनय ही कार्यक्रमाची वैशिष्ठ्ये होती.
” विंदांच्या बालकवितात , कल्पना आणि वास्तव याची सुरेख सांगड असते.त्यांचे शब्द सादर करण्याचे धनुष्य, या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनी चांगले पेलले.हे मनोहारी इंद्रधनुष्य बघताना खूप आनंद झाला. केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे या अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्वाच्या असल्याने येथील मुलांना ही सकस शिदोरी मिळते आहे.ती मुलांना मोठेपणी सक्षम बनवेल .” असे गौरवोद्गार जयश्री काळे यांनी काढले.
डॉ. करंदीकर यांनी ,” मी ए-वन आणि आमचा धाकटा भाऊ उदय हा ए-टू होता.” अशी एटूच्या देशाची जन्मकथा सांगितली, तिची मुलांना फार गम्मत वाटली.विंदांच्या या दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांची एकेक कविता सादर केली. डॉ. आनंद यांनी बेडकाची तर जयाताईंनी ‘ देणार्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ” ही कविता उपस्थितांना सांगून कार्यक्रमाची उंची वाढविली.राणी पारसनीस यांनी मनोगत व्यक्त केले.
केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी कविवर्य विंदा करंदीकर स्वतः बालरंजनला आले होते आणि २१ बालकविता खणखणीत आवाजात सादर केल्या होत्या त्याची आठवण पालकांना सांगितली. मात्र तो त्यांचा अखेरचा जाहीर कार्यक्रम ठरला असेही त्या म्हणाल्या.पुढच्या पिढीला मराठी भाषेची गोडी लावण्यासाठी दिग्गज साहित्यिकांचे साहित्य मुलांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपलीच आहे त्यामुळे असे उपक्रम आपण हाती घेत असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. शेजवलकर,डॉ. सरिता आव्हाड, रेखा बिडकर , सुमन शिरवटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
छोट्यांचे विंदा!