दिनांक: ४ फेब्रुवारी, २०१८
बालरंजन केंद्राच्या त्रिदशकपूर्तीच्या निमित्ताने,त्याच्या संस्थापक-संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी दहा विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, ड्रम-सर्कल सारखे कार्यक्रम होते. आई-बाबांसाठी ‘ आरोग्याचे पाय पाळण्यात’ हे डॉ. मिलिंद वाटवे यांचे व्याख्यान झाले. आजी-माजी, आजी- आजोबांना ‘आनंदी वृद्धत्व ‘या विषयावर डॉ.रोहिणी पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले.आता पाळी होती मुलांबरोबर किंवा मुलांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची. पुणे शहरात 30-३५ ठिकाणी बालभवने चालतात.त्यातील कार्यकर्त्यांना डॉ.श्यामला वनारसे यांनी बालकारणाची भावी दिशा दाखविली. बालरंजन केंद्रात हे सत्र पार पडले.
” पूर्वीच्या काळी घराच्या पातळीवर असलेल्या बालकारणात,जीवनगती आणि जीवनरिती यामुळे फरक पडत गेला.ताराबाई मोडक आणि गिजुभाई बधेका यांच्या काळापासूनच मुलांच्या विकासासाठी केवळ पठडीतला अभ्यासक्रम पुरेसा नाही हे जाणवू लागले होते. विभक्त कुटुंब पद्धती,महिलांचे शिक्षण,करिअर यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी संस्थात्मक गरज भासू लागली.” असे डॉ. श्यामला वनारसे यांनी सांगितले.
” बालकारणासाठी कृती आवश्यक आहे. मुले प्रथम जगली पाहिजेत,ती निरोगी रहायला हवीत.त्यानंतर त्या समाजाचा वारसा असलेल्या गोष्टी त्यांना मिळायला हव्यात.हे करताना कार्यकर्त्यांनी सावध रहावे.मुलांची स्वप्रतिमा योग्य रीतीने घडेल हे पहावे.मुले मिडिया सोबत वाढत आहेत याचे भान प्रौढांनी ठेवले पाहिजे.आज मुलांना प्रत्यक्ष अनुभव येण्याआधीच दृश्य प्रतिमा मुलांपर्यंत पोहोचत आहेत.ह्या प्रतिमांना अनुभवाची जोड देण्याची पुढील काळाची गरज आहे.माध्यमांना आपल्या उपयोगीतेत सामावून घेण्याची आवश्यकता डॉ. श्यामला वनारसे यांनी प्रतिपादन केली.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बालरंजन केंद्राच्या ‘ गाण्यांचा पाऊस- भाग 3’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. श्यामला वनारसे यांच्या हस्ते करण्यात आले.यात १०० मराठी व १५ इंग्रजी गाण्यांचा समावेश आहे. त्यानंतर श्यामलाताईनी एक गाणे सर्व कार्यकर्त्यान कडून म्हणून घेतले.यावेळी गरवारे बालभवन, महेश बालभवन, महाराष्ट्र विद्यामंडळ आदी संस्थांमधील कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभारप्रदर्शन केले.