दिनांक: १० फेब्रुवारी, २०१८
“नाटक हे एक संस्काराचे माध्यम आहे. नाटक आपल्याला संवेदनशील बनविते. इथे रंगमंचावर मुले संवेदनशीलतेचे श्वास घ्यायला शिकतात.मुले हळूहळू पुढे जातील.त्यांना सारखे धावायला लावू नका.त्यांच्या मानगुटीवर बसून त्यांचं जगणं थांबवू नका.” असे सुप्रसिद्ध अभिनेत्री व दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी म्हणाल्या. बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाच्या समारोप प्रसंगी त्या पालकांशी बोलत होत्या.
घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमात,’टीम श्यामची आई’चे संपदा जोगळेकर यांनी कौतुक केले. सर्व मुलांनी समजून उमजून अभिनय केला असेही त्या म्हणाल्या.साने गुरुजींची आई हा विषय आजच्या काळात निवडण्याचे धाडस केल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले.
साने गुरुजींची आई यशोदा साने यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने हा विषय निवडल्याचे बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.” बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाचे हे २७ वे वर्ष होते.इतकी वर्ष सातत्याने आम्ही चालविलेल्या या वर्गामुळे, नाटक हे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचे किती सशक्त माध्यम आहे हे माझ्या लक्षात आले.त्यातून आलेली समज, मिळालेला आत्मविश्वास मुलांना आयुष्यातल्या इतरही क्षेत्रात उपयोगी पडतो.मुलांचे व्यक्तिमत्व समृद्ध बनते.असा माझा अनुभव आहे.” असे माधुरी ताईंनी उपस्थित प्रेक्षकांना सांगितले.
यावेळी ‘ न वितालणारा हिमकण ‘ व ‘खमंग दुपार’ ही नाटकेही सादर झाली. श्री.देवेंद्र व सौ. रेणुका भिडे यांनी या वर्षी नाट्यवर्गाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.प्रज्ञा गोवईकर , दीप्ती कौलगुड व किशोरी कुलकर्णी यांनी साप्ताहिक सहामाही नाट्यवर्गाचे व्यवस्थापन सांभाळले. कार्यक्रमात रेणुकाताई व देवेंद्रदादा यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.नीलिमा गुंडी,विदुला कुडेकर, शशिकला चव्हाण,अलका जोशी,रेवती थिटे उपस्थित होत्या. गेली २५ वर्षे बालरंजनच्या नाटकांचे रंगभूषाकार असलेल्या श्री. प्रभाकर भावे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
संपदा जोगळेकर कुलकर्णी
खमंग दुपार