भाषेच्या शिबिराचा अनोखा समारोप

दिनांक: १५ मे, २०१८ 
 
आज भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात एक पाहुणी थेट अमेरिकेहून आली होती. ही होती बालरंजन केंद्राची माजी विद्यार्थिनी देविका चितळे – जोगळेकर. बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी देविकाला खास आमंत्रित केले होते,भाषेची गोडी शिबिराच्या समारोपासाठी.
 
बालरंजनची माजी विद्यार्थिनी देविका आधी आयटी इंजिनिअर झाली. काही वर्ष अमेरिकेत नोकरीही केली. मात्र चित्रकलेची आवड व भाषेची गोडी तिला स्वस्थ बसू देईना. तिने नोकरी सोडून लहान मुलांसाठी पुस्तके काढायची असे ठरवले. या प्रवासात तिचे आई वडील व नवरा हर्षदने साथ दिली. आजमितीला तिची १० पुस्तके प्रकाशित झाली असून आता तर तिने अमेरिकेत ‘मिहिका’ नावाने   स्वतःची प्रकाशन संस्थाही सुरु केली आहे.
 
देविकाने यावेळी मुलांना या पुस्तकातील  चित्रे दाखवून गोष्टी सांगितल्या. रंगीत चित्र बघताना मुले गोष्टीत रंगून गेली. गोष्टींचे विषय मुलांना भावले. बूट-चपला खरेदीतली गम्मत अनुभवताना मुलांना विरुद्धअर्थांचे शब्दही कळले. दिवाळीची तयारी करताना, आकाशकंदील कसा बनवायचा, बेसनाचे लाडू  कसे करायचे, लिलू आणि मोनू साडी नेसायला शिकतात, लिलू योगासने करते यासारखी अस्सल भारतीय संस्कृती परदेशी लोकांना कळावी यासाठी केलेली ही तिची इंग्रजी पुस्तके अमेरिकेतील मुलांना आवडतात.
 
“टूटू आणि लिलू ही दोन पात्र निर्माण करून देविकाने त्यांच्या गोष्टी रचल्या आहेत. सुंदर निर्मितीमुल्ये असलेली ही पुस्तके देखणी झाली आहेत. देविकामध्ये मुलांच्या भावविश्वात डोकावण्याची ताकद आहे. भाषा आणि चित्रकलेचे बीज तिच्या मनात बालरंजन केंद्रात असताना रुजले. आयटीतील नोकरी सोडून मुलांसाठी पुस्तकनिर्मितीचे धाडस करणाऱ्या देविकाचे कौतुक वाटते.” असे माधुरीताईंनी यावेळी सांगितले.
 
या कार्यक्रमाला देविकाचे आई-बाबा सौ.राधिका व श्री. रमण चितळे हेही उपस्थित होते. 
 
भाषेच्या शिबिराचा अनोखा समारोप

भाषेच्या शिबिराचा अनोखा समारोप

 

बालरंजन केंद्राची माजी विद्यार्थिनी देविका चितळे - जोगळेकर

बालरंजन केंद्राची माजी विद्यार्थिनी देविका चितळे – जोगळेकर व सौ. माधुरी सहस्रबुद्धे