आपल्या पाल्याचे स्वास्थ्य 

दिनांक: १० जुलै, २०१८

बालरंजन केंद्राच्या ‘ सुजाण पालक मंडळात ‘ प्रा. विजय जोशी यांनी, मुलांचे  स्वास्थ्य या पालकांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आपले विचार मांडले. प्रा. जोशी हे बुद्धिवर्धन क्षेत्रातील तद्न्य आहेत.स्वतः मधुमेह व उच्च रक्तदाबापासून मुक्त झाल्यावर त्यांनी स्वास्थ्य या विषयाचा अधिक अभ्यास केला.
 
” आपले शरीर हे अद्भुत यंत्र असून ते वेळोवेळी आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करते.तेव्हा आपण वेळीच जागे झाले पाहिजे.त्यासाठी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. सध्या आवडीनिवडीचा प्रकार खूप वाढला आहे.पालकांना आहारात बदल करायला सांगितला तर तो स्वीकारणे फार कठीण जाते.”
जीभेसाठी खाऊ नका तर आपले आरोग्य चांगले राहील असा आहार घ्या असे त्यांनी सांगितले. तसेच  मुलांना ९ तासांची झोप आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 
आहाराबरोबरच आपण जे बघतो, जे ऐकतो त्याचाही आपल्या स्वास्थ्यावर परिणाम होत असतो.फक्त कॅॅलरीजचा विचार करू नका तर शरीराच्या गरजांकडे लक्ष द्या. मुलांना भरपूर मैदानी खेळ खेळू द्या कारण स्थूलता हे ३० आजारांचे उगमस्थान आहे असा इशारा त्यांनी पालकांना दिला.
 
“बालरंजन केंद्राचे सजाण पालक मंडळ हा सातत्याने चालणारा उपक्रम असून तेथे कायम उत्तम वक्त्यांची निवड केली जाते. कालानुरूप व पालकांच्या मागणीवरून विषय निवडले जातात. मुलांच्या आरोग्याचा तुकड्या तुकड्यात विचार करण्याऐवजी समग्र विचार करण्याची दृष्टी आज प्रा. विजय जोशी यांनी पालकांना दिली “असे उद्गार बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी काढले.
आशा होनवाड यांनी आभारप्रदर्शन केले.
 
आपल्या पाल्याचे स्वास्थ्य