बालरंजन एक फुलबाग!

दिनांक: २३ जानेवारी, २०१८ 

“भारती निवास सोसायटीचे बालरंजन केंद्र ही एक फुलबाग आहे. येथील मुलांनी कायम आनंदी रहावे आणि पालकांनी स्वतःतील मुलपण जपत ह्या फुलांना कधीही कोमेजून देऊ नये.” असे उद्गार प्राचार्या मुक्तजा मठकरी यांनी काढले. बालरंजन केंद्राच्या ३०व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने घेतलेल्या स्पर्धांचा बक्षिस समारंभ डॉ.मठकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी, त्यांनी मुलांना दोन छानश्या कविता सांगून कार्यक्रमाची रंगत वाढविली.

मुलांचे विविध गट, तसेच आई, बाबा, आजी, आजोबा या सर्व गटातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

अध्यक्षस्थानी बालरंजन केंद्राच्या संस्थापक-संचालिका माधुरी सहस्रबुद्धे होत्या. “केवळ आपल्याच पाल्याला बक्षिस मिळावे अशी भूमिका पालकांनी ठेवू नये. बक्षिस मिळविलेल्या इतर मुलांचे खुल्या मनाने कौतुक करावे. घरोघरच्या आपल्या राजकुमार आणि राजकुमारींना नकार पचवायला शिकवले पाहिजे.” असा संदेश माधुरीताईंनी पालकांना दिला.

बालरंजन केंद्रात नुकत्याच घेतलेल्या ‘मेट्रो व स्मार्ट सिटी’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले.

तसेच, बास्केटबॉल स्पर्धेत चषक मिळविणाऱ्या सर्व खेळाडूंना डॉ.मठकरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सौ.स्मिता लाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दीपाली बोरा यांनी आभारप्रदर्शन केले.

मुक्तजा मठकरी व माधुरी सहस्रबुद्धे