दिनांक: २० जानेवारी, २०१८
“बालरंजन हा एक यज्ञ आहे.ह्या यज्ञातल्या एका सुंदर कार्यक्रमाला मला उपस्थित रहाता आले याचा आनंद वाटतो. बालकारणाची चळवळ सातत्याने चालविल्याबद्दल माधुरीताई व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करते ” असे उद्गार आमदार प्रा.सौ.मेधा कुलकर्णी यांनी काढले.भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राच्या त्रिदशकपूर्ती च्या समारंभात त्या बोलत होत्या.मैदानावर शिकलेली कौशल्ये जीवनात सगळीकडे उपयोगी पडतात.
मुलांनी एखादा छंद अवश्य जोपासावा.छंद असणारी व्यक्ती कधी निराश होत नाही असेही त्या म्हणाल्या.
समारंभाच्या सुरुवातीला, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांचा बालरंजन केंद्राला दिलेला शुभेच्छा संदेश उपस्थितांना आईकाविण्यात आला. मा. मंत्रीमहोदयांनी यंदापासून अशा शाळाबाह्य उपक्रमांचा, भारत सरकार शिक्षणात समावेश करणार असल्याचे सांगितले. माधुरीताईंच्या बालरंजन सारखी केंद्र शहरात ठिकठिकाणी निर्माण होण्याची गरज प्रतिपादन केली.
ह्या कार्यक्रमात बालरंजन केंद्रातील मुलांनी नेत्रदीपक प्रात्याक्षिके सादर केली.दोरीखाळून रांगत जाणे,दोरीवरून उद्या मारणे, पावलांच्या रंगीत ठशान्वर उद्या मारणे, पराशूटचे खेळ , आकर्षक कवायत ,अनाकोंडा , बास्केट बाल आदी नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिकांचा त्यात समावेश होता. उपस्थित पालक व पाहुण्यांनी टाळ्यांच्या गजरात मुलांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार अनिल शिरोळे म्हणाले,” ३० वर्षे काम करणे हे चिकाटी व सहनशीलतेचे द्योतक आहे. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी ते करून दाखविले. त्यांच्या कामात सहभागी व्हायला मला नक्की आवडेल.”
यावेळी अध्यक्षस्थानी डॉ.प्र.चिं.शेजवलकर होते.”आज बालरंजन चा सण आहे.बालरंजन केंद्राचे आजचे स्वरूप हे त्याच्या संस्थापक-संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांच्या तपश्चर्येचे फळ आहे.व्रतस्थ राहून त्यांनी हे काम केले आहे.बालरंजन केवळ भारती निवास सोसायटीचेच नाही तर समाजाचे भूषण आहे.या कामासाठी टीम वर्कची गरज आहे.नाविन्याचा ध्यास हे माधुरीताईचे वैशिष्ठ्य आहे आणि माणसांशी संवाद साधून त्यांना धरून ठेवण्याचे कसब त्यांच्या अंगी आहे.” असे सांगून त्यांनी माधुरी सहस्रबुद्धे यांचा गौरव केला.
माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या कुटुंबाने त्यांना दिलेल्या भक्कम पाठीम्ब्याचा माधुरी ताईंनी उल्लेख केला. आपल्या सायकोलोजी, सोशल वर्क,कम्युनिकेशन व जर्नालिझम या विषयांच्या घेतलेल्या शिक्षणाचा समाजासाठी उपयोग करता आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आपल्यातील उर्जेला व्यक्त होण्यास संधी उपलब्ध करून देणाऱ्या भारती निवास सोसायटीचे मनपूर्वक आभार मानले.
विनया देसाई यांनी उत्तमरीतीने मुलांच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.यावेळी वयाची शंभरी पूर्ण केलेल्या लीलाताई काटदरे, डॉ.श्यामला वनारसे, माधुरीताईंच्या मातोश्री कमला साठे, मंगला गोडबोले, दीपक शिकारपूर ,नगरसेवक जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर , स्मिता वस्ते ,नीलिमा खाडे ,गायत्री खडके आदी मान्यवर उपस्थित होते.