दिनांक: २९ जानेवारी, २०१८
एकापाठोपाठ एक अशा पाच फेऱ्यात बालरंजन केंद्रात ‘ ड्रम सर्कल ‘ चा आवाज घुमला.बालरंजन केंद्रातील पालक शुभा मराठे यांनी घेतलेल्या या कार्यक्रमात मुलांना खूपच मजा आली. यावेळी २० जेंबे ( आफ्रिकन वाद्य ) व २० शेकर्स अशा ४० वाद्यांच्या आवाजाने केंद्राचे मैदान दुमदुमले .रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यात धान्य,कडधान्य, वाळू भरून मुलांनी ही वाद्य तयार केली होती.छोटी मुले जेम्बेवर चक्क बसून वाजवत होती तर मोठी मुले शिस्तीत जेंबे दोन पायात धरून वाजवत होती.शेवटचे सर्कल ताई गटासाठी झाले.उपस्थित सर्वांनी वादनाचा आनंद घेतला.
शुभा मराठे यांनी प्रथम ड्रम सर्कलची संकल्पना स्पष्ट केली.प्रत्येक गटासाठी शुभा ताईने एकेक गाणे निवडले होते.ओळखीच्या गाण्यावर ताल धरताना मुले तल्लीन झाली.जेंबे वर पावसाचा आवाज ( thrumble ) कसा काढायचा ते मुले शिकली.ताईच्या हाताकडे लक्ष ठेवून मोठा, मध्यम व हळू आवाज त्यांनी काढला.प्रेक्षक मुले व पालकांनी टाळ्यांनी ताल धरला.सुंदर ताल व लय त्यांनी मस्त पकडली. त्याच मुलांचे दोन गट करून एकदा एकेक गट व एकदा दोन्ही गट वेगळे ताल पण एकत्र वाजवित आपले कौशल्य दाखवित होते.जोशपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
“मुलांच्या मनातील नकारात्मक भावनांना अशा वादनातून वाट मिळते आणि ताणतणाव दूर होतात. त्यामुळे स्ट्रेस मानेजमेंट साठी याचा वापर केला जातो” असे संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.माधवी केसकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर लता दामले यांनी आभारप्रदर्शन केले. रेणू गावस्कर, सुषमा दातार, संगीता देशपांडे, इंद्रायणी गावस्कर आदी यावेळी उपस्थित होते.