अधिक महिन्यात रुजली दानाची संकल्पना

 दिनांक: ६ जुलै, २०१८
 
लहानपणी मुलांच्या मनावर झालेले संस्कार आयुष्यभर टिकतात.त्यामुळे भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रातर्फे दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात ‘ दानाची संकल्पना ‘ मुलांमध्ये रुजविण्यासाठी मुलांकडून मदत जमविण्यात येते. ती मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणगीरूपाने देण्यात येते. हा बालरंजन केंद्राचा अधिक महिन्याचा १० वा उपक्रम होता.
 
यंदा केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी त्यासाठी ” जीवनज्योत मंडळाची ” निवड केली. केंद्राच्या वतीने काही ताईंनी तेथे भेट देऊन ही रक्कम संस्थेच्या संस्थापिका सौ. मीना इनामदार यांच्याकडे सुपूर्त केली. रु.१०० किंवा त्या पटीत आइच्चीक रक्कम देण्याचे आवाहन माधुरीताईंनी पालकांना केले होते. त्याला प्रतिसाद मिळून ३०,००० /- (तीस हजार मात्र ) इतकी रक्कम चिमुकल्यांच्या माध्यमातून जमा झाली.  
 
यावेळी जीवनज्योत मधील मुलांनी अभंग व नाट्यगीत सादर केले. तर मुलींनी समूहनृत्य करून बहार आणली. मुलांनी तयार केलेल्या वस्तू पाहुण्यांनी पहिल्या. त्या खरेदीही केल्या.ह्या भागाच्या नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सादरीकरणाबद्दल मुलांचे व गेली ३७ वर्षे उत्तम कार्य करीत असल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. यावेळी श्रीमती.कमला साठे, श्रीमती मंगला चक्रदेव, आशा होनवाड, प्रज्ञा गोवईकर , माधवी केसकर, किशोरी कुलकर्णी, वर्षा  बरिदे, बायमा खरात आदी पाहुणे उपस्थित होते.
 
सौ.मीना इनामदार यांच्याकडे देणगी रक्कम सुपूर्द करताना माधुरी सहस्रबुद्धे

सौ.मीना इनामदार यांच्याकडे देणगी रक्कम सुपूर्द करताना माधुरी सहस्रबुद्धे