दिनांक: ११ डिसेंबर, २०१८
“आपण सोशल मिडीयावर टाकलेल्या पोस्टला किती अंगठे,प्रणाम वा टाळ्या ही चिन्हे पडतात त्यावर आपला आनंद ठरतो ” अशी सध्या परिस्थिती आहे.अशाप्रकारे आपल्या आनंदाच्या किल्ल्या दुसऱ्याच्या हाती दिल्याने निखळ आनंद लोप पावतो.आनंद ही माणसाची मुलभूत भावना असून त्यावर आपलं अधिकार आहे तो अशा प्रकारे गमावू नका ” असे आवाहन समुपदेशिका स्वाती बापट यांनी पालकांना केले.
भारती निवास सोसायटीच्या, बालरंजन केंद्रातील पालकांशी त्या बोलत होत्या.
नगरसेविका आणि बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी ‘ भावना हाताळताना ‘ या विषयावर स्वाती बापट यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.’ पालकांना स्वतःच्या भावनानचे नियमन जमले तर ते मुलांच्या भावना समजून घेऊ शकतात यासाठी या व्याख्यान आणि कृतीसत्राचे आयोजन केले असल्याचे माधुरी ताईंनी यावेळी सांगितले.
” अगदी लहान बालकाला फक्त आनंद आणि दुख्ख या दोनच भावना समजतात. हळूहळू इतर आणि संमिश्र भावनांचा परिचय होतो.आपली भावना प्रथम ओळखणे,समजून घेणे, ती स्वीकारणे,तिला नाव देता येणे, ती व्यक्त करता येणे आणि सर्वात शेवटी तिचे नियमन करता येणे ह्या भावनिक विकासातील पायऱ्या आहेत. त्यासाठी पालकांना आधी स्वतःवर काम करावे लागेल. मग मुलांना ही कौशल्य शिकविता येतील.”असे स्वाती बापट यांनी सांगितले.
भावना ओळखण्याचा एक खेळ तर भावना व्यक्त करण्याचा एक खेळ उपस्थित पालक खेळले.कार्यक्रमाची सांगता ‘ मनात एक इच्छा धरत, फुगे उडविण्याच्या खेळाने झाली.अखेरीस ‘ मी आनंदी आहे व माझ्या मुलांनाही आनंदी बनवेन ‘ असा संकल्प यावेळी पालकांनी केला.
मनीषा गोडबोले यांनी प्रास्ताविक केले तर संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.
माधुरी सहस्रबुद्धे व स्वाती बापट