दिनांक: २८ नोव्हेंबर, २०१८
सुजाण पालक मंडळात झाली मुलाखत
चारचौघींसारखे चौकोनी कुटुंबातील सुखाचे आयुष्य जगत असताना केतकी जानी यांना चाई किंवा अलोपेशिया या रोगाने ग्रासले. त्यांच्या डोक्यावरचे सर्व केस गळून गेले, पुन्हा कधीच न उगविण्यासाठी. आपल्या समाजात बिन केसांच्या बाईला स्थान नाही. त्यामुळे बरीच अवहेलना त्यांच्या वाट्याला आली. त्यातून आले टोकाचे नैराश्य. पण एक दिवस धीर करून, स्वतःला आहे तसे स्वीकारण्याचे धाडस त्यांनी दाखविले.लोकांना काय वाटेल याची चिंता न करता, खुल्या मस्तकाने समाजात वावरायला सुरुवात केली.विग वापरायचा नाही असे त्यांनी ठरवले.पुढे आत्मविश्वासाने वाटचाल करत थेट सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन ३००० स्पर्धकातून त्या मिसेस इंडिया इन्स्पिरेशन २०१८ च्या मानकरी ठरल्या.
बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी ‘सुजाण पालक मंडळात’ या मुलाखतीचे आयोजन केले होते. त्यात केतकी जानी यांनी आपला हा प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. रुपाली वैद्य यांनी ही मुलाखत घेतली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय प्रामाणिक उत्तरे देत केतकी यांनी सार्यांना थक्क केले.
” केस हा स्त्रीच्या सौंदर्याचा उच्चतम मानदंड समजला जातो.मला लोकांना हे दाखवून द्यायचे होते कि केस म्हणजे सर्वस्व नव्हे.मला टोप वापरण्यामुळे येणारा खोटेपणा आणि त्याचा येणारा ताण नको होता. मला स्वतःला फसवून लोकांनाही फसवायचे नव्हते.म्हणून मी ‘बेअर हेड’ने वावरायला सुरुवात केली.” असे केतकी म्हणाल्या.
ह्या रोगाचा उल्लेख आपल्याकडे पुरातन काळापासून सापडतो. संस्कृत मध्ये त्याला ‘ इंद्र्लुप्त ‘ असे नाव आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले. केतकी जानी यांनी पूर्ण डोक्यावर टाटू केले आहे. त्याचे कारण विचारल्यावर त्या म्हणाल्या,” एकदा आरशासमोर उभी असताना माझ्या मनात आले की आपल्याकडे एवढा मोठा कानव्हास असताना टाटू का काढू नये? त्यातून टाटूची प्रेरणा मिळाली.आजही मी स्पर्धेत मिळवलेला क्राऊन न घालता हा खरा क्राऊन घेऊन तुमच्या समोर आली आहे.”असेही त्यांनी नमूद केले.
“केतकी जानी या केवळ स्वतः त्यांच्या न्युनगंडातून बाहेर पडल्या नाहीत तर सौंदर्य स्पर्धेत यशस्वी ठरून एक नवीन मापदंड त्यांनी निर्माण केलाच. शिवाय अलोपेशिया झालेल्यांसाठी मदतगट स्थापन करून जगभरातील अशा महिला आणि पुरुषांना त्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहेत याचे फार कौतुक वाटते.”असे माधुरी ताईंनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत निराश न होता, वास्तव स्वीकारून सकारात्मकतेने त्यावर मात करता येते असा संदेश घेऊन सर्व पालक घरी परतले.