‘सांगूया गोष्ट, ऐकुया गोष्ट’

दिनांक: ११ मे, २०१७ 

आज संध्याकाळी कमला नेहरू उद्यानातील साहित्यिक कट्ट्यावर मुलांना गोष्टींची मेजवानी मिळाली. पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम चालतो. नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांच्या पुढाकाराने चालू असलेल्या या कट्ट्याचे हे १० वे पुष्प होते. गेल्या वर्षी जून महिन्यात सुरु झालेल्या उपक्रमाने पावसाळ्यामुळे दोन महिन्यांची विश्रांती घेतली होती. सप्टेंबरपासून पुन्हा कट्टा बहरला तो आज मुलांच्या मोठ्या उपस्थितीमुळे खरोखरी फुलला होता.निमित्त होते ‘ सांगूया गोष्ट, ऐकुया गोष्ट ‘ या कार्यक्रमाचे.

 सुरवातीला श्री.शाम भुर्के यांनी प्रास्ताविक करून एक गोष्ट सांगितली.नंतर अनिता रणदिवे, जयश्री वैद्य,नीला साठे यांनी मुलांना गोष्टी सांगितल्या. त्यानंतर मुलांना गोष्टी सांगण्यात हातखंडा असलेल्या , बालरंजन केंद्रातील ताईनी विविध गोष्टी सांगून कार्यक्रमाची रंगत वाढविली.आशा होनवाड यांनी ‘केसा एवढा बारीक मुलगा’ , प्रज्ञा गोवईकर यांनी ‘ आरसा रडला,आरसा हसला’ , सीमा अंबिके यांनी ‘ सुरवंटाचे फुलपाखरू ‘ तर किशोरी कुलकर्णी यांनी ‘ चंद्र वाटोळा’ ही गोष्ट सांगितली.

नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी मुलांना जंगलातील प्राण्यांची गोष्ट सांगताना ‘ कौशल्य विकासाचे ‘ महत्व पटवून दिले तर अश्विनी पळणीटकर यांनी ‘ कारगिल मधील सैनिकाच्या ‘ सांगितलेल्या गोष्टीने उपस्थितांचे डोळे पाणावले.लहानथोरांच्या प्रचंड प्रतिसादात कथाकथन रंगत गेले. 

” मुलांच्या भाषा विकासासाठी कथाकथन खूपच उपयुक्त ठरत असते . गोष्टी आईक्ल्याने मुलांची शब्दसंपत्ती वाढते.कल्पनाशक्तीला वाव मिळतो. चपखल शब्दयोजना त्यांना करता येऊ लागते. मराठी भाषेची मुलांना गोडी लागते, वाढते. ” असे नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यावेळी म्हणाल्या.

” स्टोरी बोधी “मोबाईल अॅपची निर्मिती करणाऱ्या इशा पालकर व विनिता अग्रवाल यांचा यावेळी श्री. संजय भगत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .या स्टार्टअपला सर्वांनी शुभेच्छा दिल्या.डॉ . दिलीप गरुड लिखित ‘ कर्मयोगी डॉ.ए पी जे अब्दुल कलाम ‘या पुस्तकाचे नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कथाकथन करणाऱ्या सर्वाना हे पुस्तक भेट देण्यात आले.    

समितीचे श्री. नारखेडेही यावेळी उपस्थित होते.

डावीकडून-श्री.-संजय-भगत-नगरसेविका-सौ.-माधुरी-सहस्रबुद्धे-श्री.-शाम-भुर्के-व-डॉ.-दिलीप-गरुड

डावीकडून-श्री.-संजय-भगत-नगरसेविका-सौ.-माधुरी-सहस्रबुद्धे-श्री.-शाम-भुर्के-व-डॉ.-दिलीप-गरुड