सायलेंट सिटीचे दूत बना !

दिनांक: ७ नोव्हेंबर, २०१७

“आपलं पुणे शहर ‘सायलेंट सिटी’ बनण्यासाठी तुम्ही सर्वांनी ‘सदिच्छा दूत’ बना ” असे आवाहन डेप्युटी RTO श्री.संजय राऊत यांनी उपस्थितांना केले. भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात ते बोलत होते.बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,”पुणे शहर स्मार्ट सिटी होत असताना ते शांत शहर झाले पाहिजे, मोठे शहर म्हणजे मोठा कोलाहल हे योग्य नव्हे.”

“माधुरीताई सहस्रबुद्धे या सायलेंट सिटीबाबत जागृती करणाऱ्या पहिल्या लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यावेत” असे श्री राऊत म्हणाले,”हॉर्न वाजवायचा नाही हे सुरुवातीला अवघड जाईल मात्र प्रयत्नांनी जमेल.मग तुमचा प्रवास तणावमुक्त होईल. ध्वनिप्रदुषणामुळे मानसिक ताण, उच्च रक्तदाब, हृदयरोगास आमंत्रण,बहिरेपणा,वृद्ध व लहान मुलांमध्ये घबराट, मानसिक नैराश्य असे दुष्परिणाम होतात. ते टाळण्यासाठी पालकांनी मुलांना वाहतुकीच्या नियमांचे ज्ञान द्यावे.नियमांचे पालन केल्यास वाहन चालविणे सुरक्षित होते.” असे त्यांनी पालकांना सांगितले . “जो पाळतो सर्व नियम, तोच खरा सिंघम ! ” असे त्यांनी मुलांना सांगितले. श्री. संजय राऊत यांनी मुलांना अनेक प्रश्न विचारले, बरोबर उत्तरांसाठी मुलांना काकांकडून खाऊ मिळाला. चित्रमय स्लाईडस मुळे  कार्यक्रमाची रंगत वाढली.

श्री.राऊत पुढे म्हणाले,”सर्वसाधारण व्यक्ती वयाच्या २० ते ६० वर्षे म्हणजेच सरासरी ४० वर्ष वाहन चालविते. रोज १० वेळा, महिन्यात ३०० वेळा म्हणजे वर्षाला १ लाख वेळा हॉर्न वाजवते! आता १०० लोकांनी हॉर्न न वाजविण्याचा संकल्प केला तर पुढील एक वर्षात पुण्यात रस्त्यावरील १ कोटी आवाज कमी होतील!!”

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद राठी म्हणाले,” हॉर्न वाजविल्याने केवळ कानांनाच इजा होत नाही तर आपली प्रतिकारशक्तीही कमी होते .” असे सांगून नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी ही मोहीम पुढे न्यावी असे आवाहन केले.

ध्वनि प्रदुषणाच्या विरोधात काम करण्यात अग्रेसर असलेले डॉ. यशवंत ओक यावेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गेल्या चाळीस वर्षात एकदाही हॉर्न न वाजविलेले श्री. श्रीराम सहस्रबुद्धे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व मुले व पालकांनी हॉर्न न वाजविण्याची शपथ घेतली.

आशा होनवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. वाहतूक विभागाचे अधिकारी स्नेहा मेढे,निलेश पाटील, रविकुमार भट व गणेश गायकवाड कार्यक्रमास उपस्थित होते.

डावीकडून - माधुरी सहस्रबुद्धे, श्रीराम सहस्रबुद्धे, यशवंत ओक, संजय राऊत

डावीकडून – माधुरी सहस्रबुद्धे, श्रीराम सहस्रबुद्धे, यशवंत ओक, संजय राऊत