दिनांक: १५ एप्रिल, २०१७
वर्षभर मुले ज्या शिबिराची वाट पहात असतात ते ‘ मुक्काम शिबीर ‘ काल बालरंजन केंद्रात संपन्न झाले. परीक्षा संपल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी , मित्र मैत्रिणींसह रात्र जागवण्याची संधी मुले सोडत नाहीत. ८५ मुले आपापल्या अंथरूण पांघरूणासह रात्री ८ वाजता बालरंजनला दाखल झाली. शिबिराची सुरवात ‘ ट्रेझर हंट ‘ ने झाली. प्रत्येकी १२ मुलांच्या तीन टीम खजिन्याच्या शोधात निघाल्या. त्यांना सूचक चिठ्या शोधून १२ टप्पे पार करायचे होते. अटीतटीने हा सामना रंगत गेला. बालरंजनचे एक एकराचे मैदान व सभागृह येथे हे ‘क्लूज’ शोधताना मुलांची दमछाक झाली. अखेर खजिना सँड पिट मधील वाळूत मुलांना सापडला आणि पाऊण तास चाललेला हा खेळ समाप्त झाला .विजेत्या संघाला स्माईली चे बॅचेस व चॉकलेट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
त्यानंतर मुले मनसोक्त आंधळी कोशिंबीर खेळली. पॅराशूट, डाॅजबाॅल या खेळांचाही आनंद मुलांनी घेतला. शब्दांच्या, गाण्यांच्या भेंड्या, पत्ते यांनी शिबिराची रंगत वाढत गेली. रात्री भेळ व आईसक्रीमचा आस्वाद मुलांनी घेतला. त्यानंतर ‘द बटरफ्लाय सर्कस ‘ ही फिल्म दाखविण्यात आली. एका दिव्यांग मुलाच्या यशस्वी प्रवासाची ही गोष्ट मुलांसाठी प्रेरणादायी ठरली. ‘ यापुढे आमच्याकडे नसलेल्या कुठल्याही गोष्टीबद्दल आम्ही खंत बाळगणार नाही आणि आत्मविश्वासाने पुढील वाटचाल करू ‘ असा विश्वास मुलांनी संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांना दिला.
सकाळी ६ ला हिरवाई ट्रॅकवर रपेट करून आल्यावर पॅटीस खाऊन मुलांनी एकमेकांचा निरोप घेतला. बालरंजनच्या ताई दादांच्या टीमने या शिबिराचे यशस्वी आयोजन केले. ‘ रात्रभर झोपायचे नाही ‘ हा या शिबिराचा अलिखित संकेत मुलांनी यंदाही पाळला.