दिनांक: ५ डिसेंबर, २०१७
बालरंजन केंद्राच्या ३० व्या वर्षानिमित्त एका वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले होते. सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या पंचाहत्तरी निमित्त त्याचे फॅन असलेले श्री.सिद्धार्थ केळकर यांनी बालरंजन केंद्रात ‘ मेरे पास बच्चन है ‘ हा दृक-श्राव्य कार्यक्रम सादर केला.
” अमिताभ याचा अर्थ सूर्य ! भारतीय चित्रपट सृष्टीत अधिराज्य गाजविणाऱ्या आणि आपल्या तेजाने तळपणार्या या सूर्याच्या कारकीर्दीचा आढावा श्री. केळकर यांनी घेतला.लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्याला एक मंत्र दिला ज्याची आठवण त्याने आयुष्यभर ठेवली . ते म्हणत,” जिंदगी अगर मनकी हो जाये तो अच्छा है | पर अगर ना हो जाये तो ज्यादा अच्छा है |” त्यामुळेच आयुष्यातल्या कठीण प्रसंगांवर तो मात करू शकला.
दिल्लीतले बालपण, नैनितालचे शिक्षण, कोलकत्त्याची नोकरी आणि त्यानंतर मायानगरी मुंबईतले त्याचे आगमन अशी पार्श्वभूमी केळकर यांनी विषद केली. आधी नाटक मग ‘सात हिंदुस्तानी’ हा पहिला सिनेमा , पुन्हा काही पडेल सिनेमे केल्यानंतर ‘जंजीर’ सिनेमात झालेला angry young man चा उदय हा प्रवास प्रेक्षकांना भावला.तिथपासून ते पार आत्ताच्या,’ कौन बनेगा करोडोपती’द्वारे सुरु झालेली सेकंड इंनिंग त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.
अमिताभ मध्ये एक कवी व लेखकही दडलेला आहे परंतु त्याने आपल्यातल्या अभिनेत्याला न्याय दिला. आयुष्यात त्याने फक्त “द बेस्ट ” चाच आग्रह धरला. हारलेल्या माणसाला उभारी देण्याचे काम त्याने केले ,असेही सिद्धार्थ केळकर यांनी सांगितले.
आज kBC ची ८ पर्वे गाजवून वयाच्या सगळ्या खुणा शरीरावर मिरवित हा अनुभव संपन्न अभिनेता अजूनही दिमाखात पाय रोवून उभा आहे.पराभावालाच पराभूत करून त्याने हे यश प्राप्त केले आहे.असेही ते म्हणाले.
संचालिका माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या ,” सुप्रसिद्ध व्यक्तींचे फक्त ग्लॅमर समाजाला दिसते पण त्या लाईम लाईट मागची मेहनत आज श्री सिद्धार्थ केळकर यांनी प्रकाशात आणली आणि त्यामुळे अमिताभ आणखी चांगल्या प्रकारे आम्हाला उमगला.” पल्लवी गोखले व शौनक केळकर यांनी सिद्धार्थ केळकर यांना सादरीकरणात सहकार्य केले. माधवी केसकर यांनी आभार प्रदर्शन केले.