मुलांचं बालपण जपूया – डॉ. मोरे

दिनांक: ३१ जानेवारी, २०१७ 

” हल्ली शहरात घरांना अंगण नसते. त्यामुळे मैदाने राखून ठेवली पाहिजेत आणि तेथे मुलांचे बालपण जपले पाहिजे. लहानपणी मुले मनसोक्त  खेळली, स्पर्धेत भाग घेऊन जिंकली , हरली तर मोठेपणी ताण तणाव जाणवणार नाहीत. नवीन पिढीला वाढविताना संकुचित विचार नको, तर सर्वांगीण विकासाचा विचार हवा.  आजकाल प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जाते पण खेळण्याचे फायदे कोणी लक्षात घेत नाही. त्यासाठी खेळाच्या मैदानाइतकी चांगली गोष्ट दुसरी कुठली नाही” असे उद्गार संत साहित्याचे अभ्यासक आणि विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी पालकांशी बोलताना काढले. बालरंजन केंद्राच्या वार्षिक स्पर्धांच्या बक्षीस समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ संपन्न झाला.

बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले कि यंदा स्पर्धांची थीम ‘पेपर’ ही होती. सर्व स्पर्धा व बक्षिसे कागदाशी संबंधित होती तसेच सभागृहाचे सुशोभनही कागदाच्या फुलांनी केले होते. मुलांबरोबरच आईगट , बाबा गट, आजी गट व आजोबा गट या सर्व गटातील स्पर्धकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल ताईंनी आनंद व्यक्त केला. बालरंजन केंद्राने यंदा ३० व्या वर्षात पदार्पण केले असल्याने हे वर्ष केंद्रासाठी खास असणार आहे. त्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सौ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले. 

भारती निवास सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शेजवलकर यांनी सौ. माधुरी सहस्रबुद्धे आणि त्यांच्या सहकार्यांचे सातत्याने आणि तळमळीने केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले. किशोरी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर प्रज्ञा गोवइकर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी श्री. जयंत आगाशे , श्री चंद्रकांत नातू व श्रीमती सुमन शिरवटकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

अभ्यासक आणि विचारवंत डॉ. सदानंद मोरे

अभ्यासक आणि विचारवंत डॉ. सदानंद मोरे

 

डॉ. सदानंद मोरे आणि सौ. माधुरी सहस्रबुद्धे

डॉ. सदानंद मोरे आणि सौ. माधुरी सहस्रबुद्धे