मुलांवर डोळसपणे प्रेम करा

दिनांक: १५ नोव्हेंबर, २०१७

बालरंजन केंद्राच्या ‘सुजाण पालक मंडळात ‘ एका पुस्तकावरील चर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री हेमा लेले यांचे ” पालकत्वाचे कॉकटेल ” हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्याचे बालरंजन केंद्राच्याच तीन पालकांनी परीक्षण करून, आपल्या पालकत्वाच्या अनुभवांच्या आधारे चर्चेत भाग घेतला.

“आपली मुले ही आपले एक्स्टेंशन नाहीत किंवा आपली मालमत्ता नाहीत. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून त्यांचा सन्मान राखा. आणि मुलांवर डोळसपणे प्रेम करा.”असे हेमा लेले यांनी पालकांना सांगितले.

दीपाली बोरा म्हणाल्या ,”आपण पालक म्हणून वागत असताना , आपण स्वतः कसे वाढलो याचा विचार करतो.सकारात्मक बोलणार्या पालकांचे , नकारात्मक बोलणाऱ्या पालकांशी असलेले प्रमाण हे १: १४ ( एकास चौदा ) असे आहे. मुले पालकांवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून असतात त्याचा पालकांनी गैरफायदा घेऊ नये . तसे झाल्यास म्हातारपणी विरुद्ध परिस्थितीचा सामना करावा लागेल हेमा ताईंचे विचार 

मला पटले.” असे त्या म्हणाल्या.दीपाली यांनी पुस्तकातील शिस्त व शिक्षा, विचित्र औदासिन्य , पालकांचे व्यसन ,पालकांची गोची आदी प्रकरणांचा उल्लेख केला.

adv. शिल्पा महामुनी यांनी ,” माझे पालकत्व बालरंजनच्या प्रांगणात रुजले आणि फुलले ” असे सांगून इथे होणारे सुजाण पालक मंडळाचे कार्यक्रम आपल्याला समृद्ध करतात असे नमूद केले.आर्य चाणक्यांच्या काळापासून पालकत्व या विषयाचा विचार झाला असल्याचे त्यांनी  सांगितले.पालक ज्या गोष्टी आचरणात आणतात त्याच मुलांना सांगण्याचा नैतिक अधिकार पालकांना पोहोचतो.पालकांनी स्वतः मनोवृत्ती शांत ठेवावी आणि मुलांना कणखर बनवावे असे त्या म्हणाल्या. त्यसाठी त्यांनी ‘ शोध सुखाचा या धड्याचा उल्लेख केला.

श्री. कपिल अपशंकर यांनी पालकत्व हे उत्स्फूर्त असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ” पालकत्वाचे कॉकटेल ” हे हेमा लेले यांचे पुस्तक ‘ पालकत्वाचे handbook असून त्यात वेगवेगळ्या समस्यांची उत्तरे सापडतात. त्यातील नव्या जुन्याच्या संगमाने आपले पालकत्व बहरेल” असे ते म्हणाले.आपण मुलांचे रोल मॉडेल असतो हे पालकांनी लक्षात ठेवावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

 बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी या चर्चेचा अध्यक्षीय समारोप केला.” मुलांना कष्ट करायला शिकवा, चैन करायला ती  आपली आपण शिकतील.” असे सांगितले. मुलांना वाढविताना ‘ traffic सिग्नल ‘ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवावी. गैर वर्तनाला लाल दिवा, समाजमान्य वर्तनाला हिरवा दिवा असावा. मात्र नापसंत वर्तन असले तरी काही वेळा चालेल असा पिवळा दिवाही असणे गरजेचे असल्याचे सांगितले.

हा कार्यक्रम खूपच रंगला आणि आशयसंपन्न झाला असे आशा होनवाड यांनी आभार प्रदर्शन करताना सांगितले. तसेच पालकांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद दिले.

डावीकडून शिल्पा महामुनी, माधुरी सहस्रबुद्धे, हेमा लेले, कपिल अपशंकर व दीपाली बोरा.

डावीकडून शिल्पा महामुनी, माधुरी सहस्रबुद्धे, हेमा लेले, कपिल अपशंकर व दीपाली बोरा.

 

मुलांवर डोळसपणे प्रेम करा

मुलांवर डोळसपणे प्रेम करा