गरवारे बालभवन कार्यकर्ता प्रशिक्षण

दिनांक: ६ ऑगस्ट, २०१७ 

बालभवन सुरु झाल्या झाल्या मुलांच्या प्रतीक्षा याद्या वाढायला लागल्या. तेव्हाच हे लक्षात आलं की पुण्यात एक बालभवन पुरणार नाही. म्हणून ज्यांना मुलांच्यात काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी वर्षातून दोन प्रशिक्षण कार्यक्रम घ्यायचं ठरलं. त्यातून अनेक कार्यकर्ते तयार झाले आणि पुण्यात आणि बाहेरगावी सुद्धा अनेक बालभवनं सुरु झाली. मुलांना हवी होती ती संध्याकाळची खेळायची संधी मिळाली. 

नुकतंच गरवारे बालभवन मधे जुलै २०१७ मधलं ६३ वं प्रशिक्षण शिबीर पार पडलं.

प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद होता. पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, तळेगाव, मुळशी, वाघोली, हडपसर, धायरी अशा ठिकाणाहून कार्यकर्ते आले होते. 

प्रशिक्षणाचा कार्यक्रम`१५ दिवसांचा होता. १ ते २:३० पाहिलं व्याख्यान, ३ ते ४:३० कृतिसत्र आणि ४:३० ते ६ प्रत्यक्ष मैदानावरचा मुलांचे खेळ शिकण्याचा अनुभव अशी आखणी होती. FTII मध्ये अनेक वर्षे चित्रपट रसग्रहण शिकवणाऱ्या डॉ. श्यामला वनारसे यांनी ‘चेरी टेल’ आणि ‘प्रिंटेड रेनबो’ ह्या दोन चित्रफिती दाखवून मुलांसाठी फिल्म क्लब कसे चालवावेत ते सांगितले. प्रा. मिलिंद वाटवे IISER मधे जीवशास्त्राचे प्रमुख आहेत. त्यांनी कुठल्याही तांत्रिक गोष्टीत न शिरता विज्ञान दृष्टी कशी विकसित करावी हे उदाहरणं देऊन स्पष्ट केलं. प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांनी बालभवन मुलांसाठी कसं उपचार ठरतं हे समजावून दिलं. डॉ. अश्विनी गोडबोलेंनी मुलांच्या आहाराबद्दल मार्गदर्शन केलं. ज्येष्ठ लेखक आणि चित्रकार श्री. ल. म. कडू यांना नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त प्रशिक्षणात त्यांचा सत्कार केला. त्यांनी त्यांच्या घडणीला कारण ठरलेले लहानपणाचे अनेक अनुभव सांगितले. 

मा. नगरसेविका व ‘बालरंजन केंद्रा’च्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे ह्यांनी ‘बालकारणातील सकारात्मकता’ ह्या विषयावर मार्गदर्शन केले.  गेली ३० वर्षे बालकारणात कार्यरत असलेल्या माधुरीताई अगदी सुरुवातीपासून बालभवनच्या प्रत्येक प्रशिक्षणात शिकवण्यासाठी आल्या आहेत.

उमाताई बापट – ताईपणाची पथ्ये, कल्पनाताई संचेती – पुस्तकांसोबत वाढताना, स्वातीताई उपाध्ये – नाटक मुलांचं आणि सुखदाताई लोढा – मुलांच्या चित्रकलेविषयी बोलल्या. श्रीमती शोभाताई भागवत यांनी पालकशिक्षण हा विषय मांडला. बालभवनचे आर्थिक व्यवहार याविषयी सुवर्णाताई सखदेव यांनी माहिती दिली. 

चित्रकला, हस्तकला, गाणी, गोष्टी, ओरिगामी, नृत्य, विज्ञान खेळणी इत्यादी प्रात्यक्षिकंही झाली. 

अनेक खेळांचा अनुभव देणारी गंमतजत्रा, मुलांच्या आणि शिक्षणाशी संबंधित पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री ही सुद्धा प्रशिक्षणाची आकर्षणे`होती. प्रशिक्षणाची सहल संचेती भगिनींनी चालवलेल्या सणसवाडीच्या शेतावर गेली होती. 

कार्यकर्त्यांनी स्वतः लिहिलेली आणि बसवलेली नाटके मुलांसमोर सादर केली. कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणाचे मूल्यमापन केले आणि त्यांना गरवारे ट्रस्टचे अधिकारी डॉ. श्रीधर राजपाठक यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन प्रशिक्षणाचा समारोप झाला.

गरवारे बालभवन कार्यकर्ता प्रशिक्षण