दिनांक: ६ डिसेंबर, २०१६
नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर लहान लहान मुलांमध्ये खूप कुतूहल निर्माण झाले आहे . नवीन नोटा , प्लास्टिक मनी ,एटीएम हे मुलांच्या संभाषणातील विषय बनले आहेत. ह्यानिमित्ताने ६ ते १६ वयोगटातील मुलांना बँकिंगची ओळख करून देऊन, आधुनिक बँकिंगचे मर्म समजावून सांगण्यासाठी नगरसेविका व बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘लेस कॅश’ पासून ते ‘कॅशलेस’ बँकिंग पर्यंत मुलांचा प्रवास घडवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे माधुरीताई म्हणाल्या. तसेच लहानपणापासून मुलाना बचतीची सवय लावण्याचे महत्वही या निमित्ताने अधोरेखित केले. ‘Pocket Money’ मधून वाचवलेले तसेच वाढदिवसाला भेट मिळालेले पैसे घरातच पिगी बँक मध्ये ठेवण्यापेक्षा बँकेत खाते उघडून त्यात ठेवावेत म्हणजे आपोआपच मुलांना बँकिंग च्या व्यवहाराची माहिती होईल.’
अपना सहकारी बँकेचे मनेजर श्री. ग्लेन पटेल यांनी मुलांना समजेल अशा भाषेत विषयाची ओळख करून दिली. सहकार सदन चा हॉल मुलांनी फुलून गेला होता. मुलांनी उत्साहाने असंख्य प्रश्न विचारल्याने पटेल काकांना आश्चर्य वाटले. “६ वर्षाच्या पुढील मुलांना बँकेत बचत खाते उघडता येते असे सांगून श्री. पटेल यांनी पासबुक, पे इन स्लीप , विड्रोअल स्लीप, चेकबुक, ए.टी.एम., प्लास्टिक मनी (क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड) या विषयी माहिती सांगितली. नोटेवर पेनाने मजकूर लिहिणे हे नियम बाह्य असल्याने कोणीही ते करू नये असा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी बालरंजन केंद्रातील पालक हि उपस्थित होते. इतक्या लहान वयातल्या मुलांना सोप्या भाषेत बँकिंगची ओळख करून देऊन काळाबरोबर राहण्यासाठी सुसज्ज केले या बद्दल पालकांनी माधुरीताईंचे आभार मानले.