गणेशोत्सवात ‘शाळा’ !

दिनांक: ७ सप्टेंबर, २०१६

भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने यंदाच्या गणेशोत्सवात ‘शाळा’ या संकल्पनेवर आधारित मुलांचे ‘विविध गुणदर्शन’ कार्यक्रम सादर केले.

यावेळी मुलांनी, ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ व ‘छडी लागे छम छम’ या पारंपारिक गीतांपासून ते वाऱ्याच्या विमानात बसून ‘चांदोबा गुरुजींच्या शाळेची’ सैरही प्रेक्षकांना घडविली. धो धो पाऊस आल्याने शाळेला मिळणारी सुट्टी, तर बेडूक विद्यार्थी बनून वर्गात आल्यामुळे होणारी गंमतही मुलांनी अनुभवली. ‘बम बम भोले’ या गाण्यावर तर मुले मनसोक्त नाचली.

बालरंजन केंद्राच्या नाट्य-वर्गाने सादर केलेले – ‘तोत्तोचान’च्या आगळ्या वेगळ्या शाळेवरचे नाटक मुलांना भावले. पु.ल.देशपांड्यांच्या ‘चितळे मास्तर’ या कथेच्या अभिवाचनाने या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

“मुलांमधल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी बालरंजन केंद्रात विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले जातात. रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना, संगीत या गोष्टींचे फार अवडंबर न माजवता, मुलांच्या भावविश्वातले विषय घेऊन त्यावर सादरीकरण केले जाते. यंदा ‘शाळा’ ह्या थीमसाठी – पाटी व शाळेची घंटा दर्शविणारे सूचक नेपथ्य वापरले होते. या उपक्रमाचे हे २९वे वर्ष आहे. यातूनच ‘कलाकार’ व ‘प्रेक्षक’ म्हणून मुलांची जडण-घडण होत असते” असे केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, चित्रपट लेखक-दिग्दर्शक श्री.किरण यज्ञोपवीत यांनी सर्व बालकलाकारांचे कौतुक केले. “मुलांना रंगमंच आपलासा वाटणे हेच या कार्यक्रमाचे यश आहे. मुलांचा धीट आणि आत्मविश्वासपूर्ण वावर यासाठी मुलांना दाद द्यायलाच हवी” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.विद्या देशपांडे म्हणाल्या “आमची पिढी ही बालपण आनंदाने व्यतीत केलेली पिढी आहे. मात्र, आताच्या मुलांना ‘मैत्र’ निर्माण करणाऱ्या बालरंजन केंद्रासारख्या संस्थांची गरज आहे. शहरातली मुले इलेक्ट्रोनिक बेटात बंदिस्त झाल्यामुळे सतत अस्वस्थ असतात. त्यांना स्वस्थ व्हायला पालकांनी शिकविले पाहिजे”.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मंजिरी पेठे यांनी केले.

बालरंजन केंद्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

अभिवाचन-चितळे-मास्तर

अभिवाचन-चितळे-मास्तर

शाळा-चांदोबा-गुरुजींची

शाळा-चांदोबा-गुरुजींची

बेडूक-शाळेत-गेला

बेडूक-शाळेत-गेला

 डावीकडून-श्री.किरण-यज्ञोपवीत-माधुरी-सहस्रबुद्धे-व-विद्या-देशपांडे

डावीकडून-श्री.किरण-यज्ञोपवीत-माधुरी-सहस्रबुद्धे-व-विद्या-देशपांडे