बालरंजन केंद्राचा २८वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दिनांक: २३ जानेवारी, २०१६

बालरंजन केंद्राच्या २८व्या वर्धापन दिना दिवशी केंद्राचे मैदान मुले आणि पालकांच्या उत्साहाने ओसंडून गेले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.ओमप्रकाश बकोरीया उपस्थित होते. सातत्याने दीर्घकाळ चालणाऱ्या या उपक्रमाबद्दल त्यांनी बालरंजन केंद्राच्या टीमचे अभिनंदन केले. तसेच मुलांसाठी खेळायला मैदान राखून ठेवल्याबद्दल सोसायटीला धन्यवाद दिले.

यावेळी ३५० मुलांची मैदानी प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. ‘गाण्यातून व्यायाम’ ह्या संकल्पनेवर हे सादरीकरण आधारित होते.

“मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेव्यतिरिक्त बालरंजन केंद्रासारख्या उपक्रमांची नितांत गरज आहे. आजच्या काळात संस्कारांमधून शीलसंवर्धन होऊन राष्ट्रप्रेमी पिढी घडविण्यावर भर दिला पाहिजे” असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.मृणालिनी चितळे यांनी यावेळी व्यक्त केले.

ह्या उपक्रमाला मुले व पालक यांनी गेल्या २८ वर्षांत दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी समाधान व्यक्त केले. “संध्याकाळी टी.व्ही.समोर बसण्याऐवजी काही हजार मुले खेळती होऊन तंदुरुस्त झाली याचा मनस्वी आनंद होत आहे” असे त्या म्हणाल्या.

भारती निवास सोसायटीचे अध्यक्ष डॉ.शेजवलकर यावेळी उपस्थित होते. सौ आरती देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

डावीकडून श्री.ओमप्रकाश बकोरीया, सौ.मृणालिनी चितळे व सौ.माधुरी सहस्रबुद्धे

डावीकडून श्री.ओमप्रकाश बकोरीया, सौ.मृणालिनी चितळे व सौ.माधुरी सहस्रबुद्धे

बालरंजन केंद्रातील मुले प्रात्यक्षिक सादर करताना

बालरंजन केंद्रातील मुले प्रात्यक्षिक सादर करताना

बालरंजन केंद्रातील मुले प्रात्यक्षिक सादर करताना

बालरंजन केंद्रातील मुले प्रात्यक्षिक सादर करताना