दिनांक: ६ मे, २०१६
“लाज, संकीच, भीड न बाळगता प्रत्येकाला नृत्याचा आनंद घेता आला पाहिजे. ‘कसे दिसेल’ किंवा ‘कोण काय म्हणेल’ यापेक्षा त्या हालचालीतून मिळणारा आनंद अधिक महत्वाचा आहे” असे नृत्य मार्गदर्शिका अदिती व्यंकटेश्वरन यांनी बालरंजन केंद्रातील मुलांना सांगितले. भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात ‘नाचू आनंदे’ या कार्यक्रमात त्या मुलांशी संवाद साधत होत्या.
सुरुवातीला सोपे व्यायाम प्रकार घेऊन त्यांनी मुलांना ‘मोकळे’ केले. त्यानंतर संगीताच्या तालावर मुलांनी मुक्तपणे नृत्यात सहभागी झाली. अत्यंत सृजनशील पद्धतीने त्यांनी मुलांना एक नृत्य-खेळ शिकविला. एका मोठ्या कॅनव्हासची कल्पना करून, आपल्या हाताचे कोपर हाच ‘ब्रश’ आहे असे समजून, मुक्तपणे आपले स्वतःचे नाव त्या कॅनव्हासवर चितारण्यास सांगितले. ह्या खेळात मुले चांगलीच रंगून गेली. शरीराच्या विविध अवयवांच्या हालचाली किती तऱ्हेने करता येतात हे अदिती व्यंकटेश्वरन यांनी सप्रयोग दाखविले. तसेच, शरीराचा टोल सांभाळत चेहऱ्यावरचे हावभावही कसे बदलायला हवेत हे मुलांना शिकवले.
“मुलांनी आपल्याला चित्रकला किंवा नृत्य येत नाही असा स्वतःवर शिक्का मारू नये. त्याऐवजी खुल्या मनाने त्यात सहभागी झाले तरच त्यातील गम्मत कळते. आयुष्यातील सर्व गोष्टी साध्य करायचे एकमेव साधन म्हणजे आपले शरीर! म्हणून सर्वांनी आपल्या शरीराची पुरेशी काळजी घ्यावी” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका सौमाधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी मुलांना सांगितले.
मुलांबरोबर पालकांनीही ह्या नृत्य-सत्राचा आनंद घेतला.
सौ. सीमा अंबिके यांनी आभार मानले.