लहान मुलांमधील स्थूलता गंभीर 

दिनांक: १६ जुलै, २०१६

‘लहान मुलांमधील स्थूलतेकडे पालकांनी गांभीर्याने पाहायला हवे कारण स्थूलते मुळे लहान वयातच विविध आजार जडतात ‘ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध  बालरोगतज्ञ डॉ . मोहन झांबरे यांनी केले .तर ‘स्थूलपणाचे वाईट दिसण्यापेक्षा शरीरावर होणारे दुष्परिणाम जास्त तीव्र असल्याचे ‘ डॉ . स्मिता झांबरे म्हणाल्या . बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात ते बोलत होते . भूलतज्ञ डॉ . मोहन स्वामी यांनी त्या दोघांची मुलाखत घेतली . भारती निवास सोसायटीतील या कार्यक्रमात तीन तज्ञांचे विचार उपस्थिताना ऐकायला मिळाले .बदललेली जीवनशैली , जंकफूड व कोल्ड्रिंक चे वाढते प्रमाण यामुळे सुमारे 30 टक्के मुले स्थूल आढळतात . असे त्यांनी सांगितले . 

मुलांच्या आहारात आईची भूमिका फार महत्वाची असल्याचे सौ, झांबरे म्हणाल्या.आईने त्यासाठी पारंपारिक आहारच स्वीकारावा. कोल्ड्रिंक ऐवजी कोकम , नारळ पाणी , आवळा सरबत मुलांना द्यावे .बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे. असेही त्या म्हणाल्या .

‘आपले मूल अगदी गुटगुटीत , बाळसेदार दिसावे असे पालकांना वाटते .त्यासाठी ते जबरदस्तीने मुलांना खायला घालतात हे गैर आहे . त्यापेक्षा मूल सडसडीत आणि चपळ तसेच आरोग्यपूर्ण असणे जास्त महत्वाचे आहे’ असे मोहन झांबरे म्हणाले . तर डॉ स्वामी यांनी मोकळ्या मैदानावर मुलांनी रोज खेळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले .जवळपास जाण्यासाठी चालण्याचा पर्याय स्वीकारावा असेही त्यांनी सांगितले .

दोन वर्षांखालील मुलांचा ‘ स्क्रीन टाईम ‘ शून्य असावा . स्क्रीनवर काही दाखवत त्यांना जेऊ घालू नये असेही ह्या तीन डॉक्टरानी एकमुखाने प्रतिपादन केले . संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरी कुलकर्णी यांनी केले तर प्रज्ञा गोवईकर यांनी आभार मानले .

लहान मुलांमधील स्थूलता - डॉ. झांबरे

लहान मुलांमधील स्थूलता – डॉ. झांबरे