दिनांक: १९ एप्रिल, २०१६
प्रभाग ३६ मधील कमला नेहरू उद्यानात आज पुण्यातल्या पहिल्या-वहिल्या कवितेच्या बागेचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे यांनी केले. नगरसेविका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांच्या कल्पनेतून, खास मुलांसाठी ही आगळी -वेगळी बाग साकारली आहे .”पुस्तकाच्या पानामधून उठून कविता बागेत आली याचा खूप आनंद होत आहे” असे उद्गार अरुणा ढेरे यांनी उद्घाटन प्रसंगी काढले. “इथे चित्रांच्या समवेत असलेल्या कविता शिकणे मुलांसाठी नक्कीच आनंददायी ठरेल. अभ्यासापलीकडच्या ह्या मुलांचे व्यक्तिमत्व घडविणाऱ्या गोष्टी मुलांच्या हाती देणे हेच सजग पालकत्व आहे” असे त्या म्हणाल्या.
“तीन वर्ष मनात असलेली कवितेची बाग आज प्रत्यक्षात अवतरल्याचे समाधान वाटते आहे. अतिशय सृजनशील असे हे काम आहे. या बागेत एकूण ३० कविता आपल्याला भेटतील. मान्यवर कवी-कवयित्रींच्या या निवडक निसर्ग कविता आहेत. निसर्गाच्या सानिध्यात, इथे मुलांना खेळता खेळता भाषेची गोडी लागेल” असा विश्वास माधुरीताईंनी यावेळी व्यक्त केला. ‘शहरातील विविध शाळांमधील शिक्षकांनी मुलांना येथे सहलीला घेऊन यावे, या कवितेच्या बागेची सैर करावी आणि मुलांच्या भाषा विकासाला हातभार लावावा’ असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. रवी घैसास ह्या चित्रकाराच्या चित्रांमुळे कविता अधिकच सुंदर भासत असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अरुणा ढेरे यांनी ‘कोण लावते आकाशात नक्षत्रांच्या ज्योती?’ हि कविता सादर केली . ज्यांच्या कविता इथे लावल्या आहेत अशा आणखी चार कवयित्री – डॉ नीलिमा गुंडी, डॉ संगीता बर्वे, आश्लेषा महाजन व हेमा लेले यावेळी उपस्थित होत्या. त्या सगळ्यानी मुलांसमोर आपापल्या कविता सादर केल्या. त्या मुलांकडून म्हणून घेतल्या. त्यामुळे कार्यक्रमासाठी आलेल्या मुलांना सुट्टीची मेजवानीच मिळाली.
यावेळी श्री . माधव राजगुरू, श्री.शिरीष चिटणीस, श्री.सुभाष लेले, भारती पांडे, नीलिमा शिकारखाने आदी मान्यवर उपस्थित होते.चित्रकार श्री. रवि घैसास, उद्यान विभागाचे श्री.पवार , श्री.तुमाले तसेच आरोग्य विभागाचे श्री.इनामदार , कसबे व येनपुरे यांचा अरुणा ढेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आल्हाददायक वातावरणात, मान्यवरांच्या उपस्थितीत पण अनौपचारिक आणि मुलांना भावनिक समृद्धी देणारा असा हा कार्यक्रम संपन्न झाला .