दिनांक: २३ ऑक्टोबर, २०१५
“सुपरमॅन, स्पायडरमॅन किंवा सिनेमातले हिरो हे संकटकाळी धावून येतात. पण या गोष्टी काल्पनिक झाल्या. रविकिरण, मयूर आणि विनय हे तिघे मित्र मात्र एका डॉक्टरच्या संकटकाळी धावून आले आणि त्याला जीवदान दिले. ही पुण्यात, कर्वे रोडला घडलेली खरी गोष्ट आहे. त्यामुळेच ते मुलांसाठी खरे-खुरे आयडॉल्स आहेत” – असे उद्गार नगरसेविका व बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ.मधुरी सहस्रबुद्धे यांनी काढले. भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने ह्या तरुणांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. सोसायटीचे अध्यक्ष डॉ.प्र.चिं. शेजवलकर यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला.
कर्वे रोडवरील सावरकर स्मारकाच्या सिग्नलला, एका डॉक्टरला गाडी चालवीत असताना पक्षाघाताचा झटका आला. त्यावेळी ‘गोल्डन अवर’ मध्ये ह्या तीन तरुणांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यामुळे त्याच्यावरील बाका प्रसंग टळला. “आजची तरुणाई स्वतःतच मश्गुल व समाजाविषयी बेफिकीर असते असे विधान सरसकट केले जाते. पण या तरुणांनी त्याला छेद दिला आहे” असे डॉ.शेजवलकर म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना रविकिरण माने म्हणाला ‘केवळ बघ्याची भूमिका न घेता वेळेला धावून जाणे हे ‘माणूस’ असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे आम्ही काही विशेष केले आहे, असे आम्हाला वाटत नाही. तरुणांनी झापडं न लावता आपल्या परिसराबद्दल सजग झालं पाहिजे’.

