दिनांक: १७ नोव्हेंबर, २०१७
‘करील रंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभुशी तयाचे’
या उक्ती प्रमाणे, मुलांशी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दृढ नाते जोडलेल्या शोभा भागवत यांनी कमला नेहरू उद्यानातील साहित्यिक कट्ट्यावर मुलांसाठी एक सुंदर कार्यक्रम सादर केला. त्यांना गरवारे बालभवनच्या संचालिका डॉ.विदुला म्हैसकर यांनी सुरेख साथ दिली.
नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे आयोजित या साहित्यिक कट्ट्यावर बालदिना निमित्त एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘ आम्ही आकाश बघू , आम्ही झाडे बघू ‘या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. स्वराज नावाच्या छोट्या मुलाची गोष्ट विदुला ताईंनी सांगितली. ती सांगताना त्यांनी वर्तमानपत्राच्या कागदाच्या ६ प्रकारच्या टोप्या मुलांना शिकविल्या. इरलं,बावर्ची ,वाणी ,सावकार ,फायर ब्रिगेड , हवालदार यांच्या टोप्यासह त्याच कागदाची बोट आणि शेवटी लाईफ जाकेट झाले. ते पाहून मुलेच काय पण मोठी माणसेही हरखून गेली.
शोभा भागवत यांनी मुलांना छानशा कविता व गोष्टी सांगितल्या. शोभाताईची ‘ माझ्या बोटात जादू आहे ” ही कविता मुलांना फारच आवडली.दलाई लामांच्या कवितेने मोठ्यांना अंतर्मुख केले.
नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे ह्यांचा बालकरणातला अनुभव दांडगा आहे. त्यांनी तीन गाणी मुले व मोठ्यांकडून म्हणून घेतली आणि कार्यक्रमाची रंगत वाढविली.
यावेळी नगरसेविका स्मिता वस्ते, श्री. बापट, श्री. शाळीग्राम व वासंती काळे उपस्थित होत्या. पुणे मनपाच्या मराठी भाषा संवर्धन समितीचे सदस्य श्री.शाम भुर्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अशा रितीने साहित्यिक कट्ट्यावरचा हा सतरावा कार्यक्रम संपन्न झाला. पुढील महिन्यात शब्दप्रभू मंगेश पाडगावकर यांच्या साहित्या वरील कार्यक्रम सादर केला जाईल असे माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.
साहित्यिक कट्ट्यावर मुलांची किलबिल