दिनांक: २६ डिसेंबर, २०१७
पुण्यातील भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने, नगर येथील कांकरिया करंडकावर आपले नाव कोरले. राज्यस्तरीय कांकरिया करंडक स्पर्धेत बालरंजन केंद्राने ‘ श्यामची आई ‘ हे देवेंद्र भिडे लिखित बालनाट्य सादर केले होते. त्यावर परीक्षकांनी आपल्या पसंतीची मोहोर उमटविली आणि हे नाटक करंडकाचे मानकरी ठरले.
बालरंजन केंद्राच्या संस्थापक संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या,” बालरंजन चे तिसावे वर्ष आता संपत आले आहे, अशावेळी मिळालेले हे बक्षीस आनंददायी आहे. गेली पंधरा वर्षे आम्ही या स्पर्धेत भाग घेतो. त्यात अनेक पारितोषिके पटकाविली. तसेच हा मानाचा करंडक तिसर्यांदा मिळविला आहे. यंदा साने गुरुजींची आई यशोदा साने यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे श्यामची आई नाटकाची निवड केली. मुलांच्या सुंदर अभिनयाने ती निवड सार्थ ठरली.”
दिग्दर्शनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देवेंद्र भिडे यांना मिळाले.अभिनय स्त्री प्रथम पुरस्कार श्यामच्या आईची भूमिका अप्रतिम वठविणाऱ्या रेवती देशपांडेने पटकाविला. नेपथ्याचा प्रथम क्रमांकही बालरंजन ने मिळविला. कांकरिया करंडकासह चार पुरस्काराने बालरंजन केंद्राचे “श्यामची आई” सन्मानित झाले. उत्तम टीमवर्कचे प्रदर्शन करीत नाटक प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले. रेणुका भिडे यांचे पार्श्वसंगीत व प्रकाशयोजना या बाबीही उल्लेखनीय होत्या. माधुरीताइंनी सर्व चमूचे अभिनंदन केले.
‘श्यामची आई’ सादर करताना बालरंजन ची मुले
‘श्यामची आई’ सादर करताना बालरंजन ची मुले