दिनांक: १० जून, २०१७
ह्या वर्षीची जागतिक पर्यावरणदिनी ‘युनो’ नी जाहीर केलेली थीम आहे, ‘निसर्गाशी नाते जोडा’. त्यानिमित्ताने जगभर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. आजवर प्रामुख्याने हे उपक्रम शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी मंडळी व उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी घेतले जात. पण यंदा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व त्यांचे पालक यांना निसर्गाशी जोडून घेण्यासाठी खास प्रयत्न केले जाणार आहेत.
असेच प्रयत्न भारती निवास सोसायटीचे बालरंजन केंद्र करीत आहे. त्याअंतर्गत केंद्रातील मुलांनी बालचित्रवाणीच्या मागील टेकडीला भेट देऊन तेथील खत प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी ग्रीन हिल ग्रुपचे श्री.रवी पुरंदरे यांनी मुलांना माहिती दिली. “येथे नारळाच्या शहाळ्यापासून खत केले जाते. असे ३० टन खत तेथे तयार आहे. हे खत झाडांसाठी खूप उपयुक्त आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढत चालले असून त्याचा सर्व प्राणीमात्रांवर घातक परिणाम होत आहे.त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावून पर्यावरण संतुलन राखले पाहिजे” असे ते म्हणाले.
नगरसेविका व बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या,”इथे आपण शहाळ्याच्या पासून खत बनवितो. ही शहाळी श्रेडींग मशीन मधून बारीक करून काढताना एक मोठी अडचण येते ती म्हणजे त्यात असलेल्या प्लास्टिकच्या straw. त्या मशीन मध्ये गुंतून ते वारंवार बंद पडते. यासाठी शहाळी विक्रेत्यांनी straw तेथेच वेगळ्या केल्या पाहिजेत. ‘segregation at source’ चे तत्व येथे पाळले गेले पाहिजे. केवळ आपल्याच नाही तर शेजार-पाजारच्या प्रभागातील शहाळी व पालापाचोळा येथे आणून त्या कचऱ्यापासून उत्तम खत तयार होते. हे ह्या प्रकल्पाचे वैशिष्ठ्य आहे.”
बालरंजन केंद्रातील मुलांनी या पावसाळ्यात येथे येऊन झाडे लावण्याचा संकल्प यावेळी केला.