दिनांक: ५ जून, २०१७
नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या ग्लोबल हार्मनी स्पर्धेत बहुभाषिक नाटकांच्या गटात भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ राज्याचे शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
साने गुरुजींची आई यशोदा जोशी-साने यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून बालरंजन केंद्राने ‘ शामची आई ‘ हे नाटक सादर केले. पात्रांची चपखल निवड, शंभर वर्षांपूर्वीचा काळ दाखवणारे नेपथ्य, प्रसंगांना साजेसे पार्श्व-संगीत, नेटकी प्रकाश योजना व सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय ही या नाटकाची वैशिष्ठ्ये होती. उत्कृष्ठ सादरीकरणाने या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली तसेच परीक्षकांची वाहवा मिळविली.
टाळ्यांच्या गजरात नाटकाची सांगता झाली .एकूण ६ बक्षिसे शामची आई ने मिळविली.
१) निर्मिती प्रथम क्रमांक – निर्माती माधुरी सहस्रबुद्धे
२) दिग्दर्शन प्रथम क्रमांक – देवेंद्र भिडे
3) प्रकाश योजना व संगीत प्रथम क्रमांक – रेणुका भिडे
४) अभिनेत्री प्रथम क्रमांक – रेवती देशपांडे
५) सहाय्यक अभिनेत्री प्रथम क्रमांक – सुहानी धडफळे
६) सहाय्यक अभिनेता प्रथम क्रमांक – ऋग्वेद शेंडे
‘बालरंजन केंद्राचे हे ३० वे वर्ष चालू आहे. या विशेष वर्षात केंद्राने प्राप्त केलेलं हे यश समाधानकारक आहे’ असे मत केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी व्यक्त केले.