दिनांक: २० डिसेंबर, २०१६
भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रातील मुले एक अभिनव खेळ खेळली . खेळाचे नाव होते ‘संस्कारांची सापशिडी’. चुकीच्या वर्तनाबद्दल गिळत होता साप आणि चांगले वागले असता मिळत होती शिडी. दहा फुट रुंद आणि दहा फुट लांब अशा मोठ्या सापशिडीच्या पटावर प्रथम मोठ्या फाश्याने मुले दान टाकत होती. जितके दान पडेल तितकी घरं मुले पुढे सरकत होती. कुणाच्या डोक्यावर रंगीत टोप्या तर कुणाच्या गळ्यात फुलांच्या माळा. कुणाच्या डोक्यावर मुगुट तर कुणाच्या गळ्यात तावीज. असा धमाल माहोल होता. स्वच्छ राहणारी, सार्वजनिक ठिकाणी घाण न टाकणारी, मोठ्यांना आदर देणारी, जास्त पुस्तके वाचणारी मुले शिडी मिळून वर जात होती, तर अभ्यास न करणाऱ्या, इतरांना त्रास देणाऱ्या, पानात वाढलेले अन्न न संपवणाऱ्या व जंक फूड खाणार्या मुलांना साप गिळत होता. खेळता खेळता मुलांच्या मनात संस्कारांची रुजवण होत होती. १०० या आकड्यावर पहिल्यांदा पोचणाऱ्या मुलाने “भारत माता कि जय ! ” अशी घोषणा दिली आणि त्याला सोनेरी मुगुट मिळाला.
यावेळी बोलताना बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे म्हणल्या , ” बालरंजन केंद्राचे पालक हुन्नरी आहेत. त्यापैकी अस्मीची आई पद्मिनी पानसे हिची ही संकल्पना आहे . तिच्याशी चर्चा करून , मुलांची मानसिकता लक्षात घेऊन याला आम्ही मूर्त रूप दिले आहे . याचा उपयोग केवळ बालरंजन च्या मुलांसाठी न करता विविध ठिकाणी जाऊन मुलांसाठी हा खेळ घेण्याचा आमचा मानस आहे. खेळता खेळता मुलांवर झालेले संस्कारच खोलवर रुजतात असा माझा गेल्या तीस वर्षांचा अनुभव आहे . जुन्या खेळाला नवे रूप दिल्याने तो रंजक झाला आहे. या खेळामुळे बालरंजन केंद्राच्या सृजनशील कामात नवी भर पडली आहे ‘ आशा होनवाड यांनी आभारप्रदर्शन केले.