दिनांक: १० ऑगस्ट, २०१६
‘सूर निरागस हो’ ह्या गाण्याचे बासरीवरील सूर ‘सहकार सदन’ मध्ये निनादले. भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात ‘वाद्यांची ओळख’ या मालिकेत श्री.अमर ओक यांनी ‘बासरी’ ह्या वाद्याची मुलांना ओळख करून दिली. “बासरी हे श्रीकृष्णाचे वाद्य. एक सरळ बांबूचा तुकडा घेतला आणि त्याला ६ छिद्रे पाडली कि बासरी तयार होते. ह्या छिद्रातून षडरिपू बाहेर पडतात. बासरी आतून पोकळ असते, म्हणजेच तेथे आकाशतत्व अस्तित्वात असते. मुलांनी मनाने बासरीसारखे सरळ असावे.” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी लहान मोठ्या आकाराच्या २५-३० बासऱ्या मुलांना दाखविल्या. त्यांच्या आकारानुसार स्वरांत होणारा फरकही समजावून सांगितला. उपस्थितांमधील मोठ्यांसाठी ‘मोगरा फुलला’, ‘दिल है छोटासा’ ही गाणी तर छोट्यांसाठी ‘अग्गोबाई-ढग्गोबाई’, ‘कुच्ची-कुच्ची रकमा’, ‘किलबिल किलबिल’ ही गाणी सादर करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.
अमर ओक यांचे चिरंजीव अभय याने सादर केलेल्या तारे जमीन पर मधील ‘मेरी मां’, तसेच जंगल बुक मधील ‘चड्डी पहन के फूल खिला है’ या गाण्यांना बालचमूंनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. त्यांचा दुसरा मुलगा अजय याने एक बालगीत सादर केले. यानंतर श्री.अमर व कु.अभय यांच्या बासरीच्या जुगलबंदीने झाली. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाची सांगता कु.अभयने बासरीवर वाजविलेल्या राष्ट्रगीताने झाली.
संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले तर सौ.लता दामले यांनी आभार मानले. यावेळी श्री.प्रकाश भोंडे, श्री. संजय गोखले, श्री.चंद्रकांत नातू आदी मान्यवर उपस्थित होते.
अमर ओक – बासरी वादन १
अमर ओक – बासरी वादन २