दिनांक: २८ मे, २०१६
भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राने खास सुट्टीनिमित्त दोन बालनाट्यांचे सादरीकरण केले . ‘ड्रामेबाज’ व ‘सिंहगडाला जेव्हा जाग येते ‘ही दोन नाटके उत्तम अभिनयाने नटलेली होती .दोन्ही नाटकांचे प्रयोग खूपच रंगले . बालरंजन केंद्रातील हे बालकलाकार नवोदित न वाटता कसलेले नट , नटी वाटत होते .उपस्थितांनी नाटकांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली . सिंहगड नाटकातील ‘ पोवाड्याच्या प्रवेशाला ‘ प्रेक्षकांनी वन्स मोअर दिला . पोवाड्याने मुलांना स्फुरण चढले . इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी ह्या उद्देशाने ह्या नाटकाची निवड केली असल्याचे संचालिका सौ माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले . ड्रामेबाज हे नाटक ‘रिअलिटी शो ‘ मागील वास्तव दाखविणारे तसेच पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते असे त्या म्हणाल्या . बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाचे हे २६ वे वर्ष असून आजवर नाट्यवर्गातून सुमारे ६५० मुलेमुली प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत . त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य कलेचा फार उपयोग झाला असल्याचे त्यांनी सांगितले .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध बासरी वादक श्री . अमर ओक व लेखक -अभिनेता – दिग्दर्शक श्री . प्रवीण तरडे हे उपस्थित होते .अमर ओक यांनी बालरंजन केंद्राच्या ‘ नाट्यवर्ग ‘ उपक्रमाचे कौतुक केले . प्रवीण तरडे यांनी जागरूक पालकांमुळे मुलांना आपले नाट्यगुण दाखविण्याची संधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले . यावेळी नाटकांचे दिग्दर्शक देवेंद्र भिडे , सगीत देणाऱ्या रेणुका भिडे उपस्थित होते .
मुलांचे कौतुक करण्यासाठी रेणूंताई गावस्कर , डॉ . न . म . जोशी , अभिनेत्री वीणा फडके , अनुराधा पंडित , श्री. जयंत व सौ गीता दुवेदी,श्रीमती सुधाताई बोधनी तसेच संगीता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते .