दिनांक: २१ जून, २०१५
भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात मुले व पालकांसाठी योगासने व प्राणायामाची प्रात्याक्षिके आयोजित केली होती. ‘सोहम् योग केंद्राच्या’ विद्या परळीकर व हेमा अवताडे यांनी मुलांकडून विविध क्रिया व आसने करून घेतली, तसेच गमतीने करावयाचे प्राणायामही शिकविले.’योगासनांमुळे लवचिकता व एकाग्रता वाढते, तर प्राणायामाने श्वासावर आणि पर्यायाने भावनांवर नियंत्रण ठेवता येते’ असे त्या याप्रसंगी म्हणाल्या. अक्षय माने, आकाश कांबळे व कौलिक बहिरट या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिके पाहून बालरंजन केंद्रातील मुले थक्क झाली. या मुलांच्या अंगात ‘हाडे’ आहेत कि नाहीत असा प्रश्न पडावा इतकी ही मुले लवचिक होती. यावेळी बालरंजन केंद्राच्या सुमारे २०० मुलांनी प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन त्याचा आनंद लुटला.
“योगामुळे शरीर आणि मनाचे संतुलन साधले जाते. योगसाधना ही मुलांना स्वस्थ, शांत आणि समाधानी बनविते. म्हणूनच योगशास्त्राला मानवी जीवनाचा परिपूर्ण विकास साधणारे शास्त्र म्हणतात” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका व नगरसेविका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले. सौ.आशा होनवाड यांनी आभार मानले.