दिनांक: १६ सप्टेंबर, २०१७
सध्या माध्यमात धुमाकूळ घालणारा विषय म्हणजे ‘ ब्ल्यू व्हेल ‘. पालकांना भयभीत करणाऱ्या या विषयावर बालरंजन केंद्राच्या ‘ सुजाण पालक मंडळात ‘, समुपदेशिका डॉ. शिरीषा साठे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
“सुरुवातीला मुले आकर्षण म्हणून असे खेळ खेळू लागतात. कालांतराने त्याचे व्यसनात कधी रुपांतर होते ते मुलांच्या लक्षातही येत नाही. चिडचिड करणे, आदळआपट करणे, डोके दुखणे, डोळे दुखणे, पोश्चर बिघडणे, अभ्यासात लक्ष न लागणे असे बदल मुलांमध्ये दिसू लागतात. अशावेळी पालकांनी विशेषत्वाने मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.” असे डॉ. साठे म्हणाल्या .
हा गेम अॅपवर डाउनलोड करता येत नाही त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. फक्त मुलं सोशल साईटवर ह्याची जास्त माहिती घेत नाही ना? याची खबरदारी पालकांनी घ्यावी असा दिलासा त्यांनी पालकांना दिला.
“नकारात्मकता वाढविणारा हा खेळ आहे. कुठेही गेले तरी तेच खेळावेसे वाटते. ब्ल्यू व्हेल मासे जसे स्वतःहून पाण्याबाहेर येतात आणि कालांतराने मरतात, म्हणजे एक प्रकारची आत्महत्याच करतात असा हा खेळ आहे. ह्या खेळाचे अॅडमिन मुलांपर्यंत पोहोचतात. मानसिक दृष्ट्या कमकुवत व्यक्ती याच्या ‘शिकार’ ठरतात.”
यावर उपाय सांगताना डॉ. शिरीष साठे म्हणाल्या,”पालकांनी मुलांशी संवाद वाढविला पाहिजे. ‘स्क्रीन’ पासून मुलांना दूर ठेवा. त्यासाठी आधी आपले जग या स्क्रीन ने किती व्यापले आहे ते तपासून पहा.आपला आणि मुलांचा स्क्रीन टाईम कमीतकमी ठेवा. स्क्रीनवरील खेळ खेळून मुलांचा मेंदू
शिणतो त्याउलट मैदानी खेळ खेळल्याने मेंदूला सकारात्मक चेतना मिळते. त्यासाठी मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करा.” असेही त्या म्हणाल्या.
दीपाली बोरा यांनी प्रास्ताविक केले. बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. “तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र असल्याने पालकांनी ते जपून वापरावे. आपल्या मुलांना त्यापासून वाचविण्यासाठी प्रथम आपणही त्यापासून दूर राहावे” असे आवाहन माधुरीताईंनी याप्रसंगी पालकांना केले.