मराठी भाषेची गोडी

दिनांक: २२-२४ मे, २०१७ 

गेली २५ वर्षे भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात दर उन्हाळी सुट्टीत ‘मराठी भाषेची गोडी’ हे शिबीर घेतले जाते.
केंद्रात येणारी बहुसंख्य मुले ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. पण, त्यांची मातृभाषा मराठी असते. अशावेळी, मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी शिबिराद्वारे प्रयत्न केला जातो. 

यंदाचे शिबीर सीमा अंबिके, दीप्ती कौलगुड, लता दामले, किशोरी कुलकर्णी व वर्षा बरिदे यांनी घेतले. शिबिराची सुरुवात ‘शब्दपाकळ्यांच्या’ खेळाने झाली. ताईंनी रंगीत पाकळ्या उधळल्या. प्रत्येक मुलाने एकेक पाकळी उचलली. पाकळीवर लिहिलेल्या विषयावर प्रत्येकजण ५ – ५ वाक्यं बोलले. ‘चंद्र’, ‘पाऊस’, ‘ऊन’, ‘घर’, ‘संगणक’ असे यातील विषय होते.

प्रत्येक गटाला एकेक अक्षर दिल्यावर त्यांनी बाराखडीतील एकेका अक्षराचे १००-१०० शब्द सांगितले.यातून मुलांची शब्दसंपत्ती वाढली. विशेषण म्हणजे काय ? ते जोडल्याने शब्दाला प्राप्त होणारा आशय मुलांनी जाणला .समानार्थी व विरुद्धार्थी शब्द , म्हणी ,शब्दकोडी सोडविणे व रचणे , पहिल्या दोन ओळी देऊन उरलेली कविता पूर्ण करणे हे खेळ मुले खेळली . मराठी भाषेतील भूतकाळ , वर्तमान काळ व भविष्य काळात वाक्ये रचण्याचा आनंद मुलांनी घेतला . बालरंजन च्या संग्रहातील पुस्तके त्यांनी हाताळली, वाचली. 

” या सर्व भाषेशी निगडीत गमती-जमती करण्यासाठी बच्चे कंपनीला सुटीतच मोकळा वेळ मिळतो . त्यामुळे सुटीचा चांगल्या प्रकारे विनियोग करण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन केले जाते.” असे केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी समारोप प्रसंगी सांगितले.यंदा केंद्राच्या ३० व्या वर्षात हे शिबीर केंद्रातील ताईंनी घेतले याबद्दल माधुरीताईंनी समाधान व्यक्त केले. शिबिरात ६ ते १२ वर्षांची  सुमारे ३० मुले सहभागी झाली होती . मराठी भाषेची गोडी मुलांना लागावी यासाठी हे शिबीर विनामुल्य ठेवण्यात आले होते.शिबिरार्थींच्या पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.