दिनांक: १५ नोव्हेंबर, २०१६
बालरंजन केंद्रात ‘बालदिना’निमित्त ‘फुलोरा नाट्यछटांचा’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बालरंजनच्या नाट्यवर्गातील मुला-मुलींनी विविध विषयांवरील नाट्यछटा सादर केल्या. यात ऋग्वेद, सुहानी, ध्रुव, श्रावणी, ओम, श्रिया, ऋषिका, केतकी, अर्णव आदी मुलांनी भाग घेतला.
सिने-दिग्दर्शक श्री.आदित्य इंगळे हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुलांच्या अभिनयाला त्यांनी याप्रसंगी दाद दिली. सध्याच्या आभासी दुनियेत मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काम करणारे बालरंजन केंद्र हे आगळे-वेगळे ठरते असे सांगून त्याला उत्तम प्रतिसाद देणाऱ्या पालकांचे श्री.इंगळे यांनी अभिनंदन केले. “मुलांना जीवघेण्या स्पर्धेपासून दूर ठेवा आणि विविध गोष्टींमध्ये सहभागी होऊ द्या. आपण सध्या फारच बंदिस्त कोशात जगत आहोत. त्यापेक्षा मुलांना मोकळ्या वातावरणाचा आनंद घेऊ द्या. मुलांमध्ये उपजतच कुतूहल असते. ते जागवण्याचे काम करा.”
“नाट्यछटा हा मुलांच्या अभिव्यक्तीसाठी अतिशय चांगले मध्यम आहे. सादरीकरणाच्या तीन मिनिटांच्या अवधीत मुलांना त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवण्याची संधी यात मिळते. म्हणून नाट्यवर्गातील सर्व मुलांनी नाट्यछटा सादर कराव्यात असा आग्रह मी धरते” असे प्रतिपादन बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले.