दिनांक: २० मे, २०१६
‘उदकवाद्य’ अर्थात जलतरंग
“तबला, सतार यासारखी वाद्ये ताण देऊन बनविलेली असतात. पण जलतरंग या वाद्यामध्ये कुठलाही ताण नाही त्यामुळे हे वाद्य ऐकून ताण नाहीसा होतो ” असे प्रतिपादन पं. मिलिंद तुळाणकर यांनी केले . भारती निवास सोसायटी च्या बालरंजन केंद्रात, “वाद्यांची ओळख ” या कार्यक्रमात ते बोलत होते.”जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मिळ आहेत. ह्या समोर बसलेल्या मुलांमधून भावी वादक निर्माण होतील” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ही ६४ कलांमधील एक कला आहे . “ह्या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात . ह्यात कमीतकमी १२ भांडी तर जास्तीत जास्त २६ भांडी मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार मांडलेली असतात. बांबूच्या किंवा प्लास्टिक च्या काठ्यानी ते वाजवितात. भांड्यातील पाण्याची पातळी कमीजास्त केल्यास स्वर बदलतात. जलतरंगाचा आवाज थेट अंतर्मनात जातो त्यामुळे संगीतोपचारा मध्ये त्याचा वापर करतात” असेही ते म्हणाले.
“भर उन्हाळ्याच्या दिवसात बालरंजन च्या मुलांनी जलतरंग या वाद्याचा आनंद घेतला. आपल्या शरीरात जसे 80% पाणी असते तसे या वाद्यातहि 80% पाणी असते.या वाद्यात सगळी भांडी मिळून ५ लिटर पाणी लागले. कार्यक्रमानंतर मुलांनी ते पाणी झाडांना घातले” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका यांनी सांगितले.
सौ.सीमा अंबिके यांनी प्रास्ताविक केले, तर माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.