वेळ घालवू नका, वेळ वापरा!

 दिनांक: ३ फेब्रुवारी, २०१८ 

बालरंजन केंद्रात ३० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘आजी-आजोबा मेळाव्याचे’ आयोजन संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले होते.वृद्धत्वकल्याणशास्त्रातील तज्ञ डॉ.रोहिणी पटवर्धन यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मुलांसाठी, आई-बाबांसाठी कार्यक्रम झाल्यानंतर आता खास आजी-आजोबांना आमंत्रित करण्यात आले होते.त्यांना छोटीशी भेट देऊन साऱ्यांचे स्वागत करण्यात आले. 

यावेळी बोलताना डॉ.पटवर्धन म्हणाल्या,” आपण नातवंडाना शुभंकरोती शिकवितो . त्यातला आरोग्यम धनसंपदा हा क्रम लक्षात ठेवावा.साठी नंतरचे माझे आयुष्य मी कसे घालावितोय/घालवतेय? असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा.वेळ घालविणे आणि वेळ वापरणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.आयुष्याचा हेतू ठरला कि वेळ चांगल्याप्रकारे वापरता येतो.माध्यमांच्या आहारी जाऊ नका. रोज ४० मिनिटांपेक्षा जास्त टी.व्ही.पाहू नका .”असा सल्ला रोहिणीताईंनी ज्येष्ठांना दिला.

” आयुर्मान वाढल्यामुळे आपले किमान ८० वर्षांपर्यंत नियोजन करून ठेवा.पुण्यात राहणारे ज्येष्ठ भाग्यवान आहेत. समाजाबद्दल संवेदनशील राहिलात तर इथे तुम्हाला काम करण्याच्या अमर्याद संधी आहेत.जे काही ठरवालं त्याच्याशी ठाम रहा. तुम्हाला आनंदी राहण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही.” हा आशावाद डॉ. पटवर्धन यांनी श्रोत्यांमध्ये जागविला. रोहिणीताईंनी नेत्रदान,त्वचादान व देहदानाबद्दल माहिती सांगितली.’लिव्हिंग विल’ ची संकल्पनाही स्पष्ट केली.

कार्यक्रम अतिशय उद्बोधक झाल्याचा अभिप्राय देत आजी- आजोबा घरोघरी परतले. आशा होनवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभारप्रदर्शन केले.

डॉ.रोहिणी पटवर्धन

डॉ.रोहिणी पटवर्धन