थायलंड हा निसर्गसमृद्ध प्रदेश

दिनांक: ९ ऑक्टोबर, २०१८

“थायलंड हा निसर्गसमृद्ध प्रदेश असून तेथील लोक प्रामाणिक आहेत.पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. विनम्रता हा त्यांचा मोठा गुण आहे. खूप मोठ्या प्रमाणावर स्त्रिया तेथे कामे करताना दिसतात. लहानपणापासूनच तेथे मुलांवर निसर्गसंस्कार करतात. त्यामुळे ती निसर्गप्रेमी होतात.”असे पक्षीतज्ञ किरण पुरंदरे म्हणाले. भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात,’ थायलंड मधील निसर्ग आणि वन्यजीवन ‘ या विषयावरील दृक्श्राव्य कार्यक्रमात ते बोलत होते.

” थायलंड हा देश भारतापेक्षा सहापट लहान असून तेथील लोकसंख्या ६ कोटी ९२ लाख आहे.तेथे २६४ सस्तन प्राणी आढळतात. १००० जातीचे पक्षी आणि ११०० प्रकारची फुलपाखरे सापडतात.” अशी उद्बोधक माहिती ‘किका’ यांनी मुलांना दिली. किरण काकांच्या वर्णनात मुले रंगून गेली.

त्यानंतर तेथील फळे, फुले,मासे, पक्षी यांचे स्वतः टिपलेले फोटो त्यांनी मुलांना दाखविले.जंगली हत्ती हा थायलंडचा राष्ट्रीय प्राणी असून बहावा हा राष्ट्रीय वृक्ष असल्याचे ते म्हणाले.

मंकी आयलंडवरील ‘डस्की लीफ मंकी’ या जातीच्या माकडांच्या, लवणस्तंभातील बोगद्यापलीकडे जावून समुद्राच्या पाण्यात खेळणाऱ्या माकडांच्या टोळ्यांची मुलांना मजा वाटली.जागल्या कीटकाचा फक्त नर बोलतो, मादी मुकी असते.या गोष्टीची मुलांना गम्मत वाटली.तर कमळाच्या पानावर पाण्याच्या थेंबात लपलेल्या बेडकाचा फोटो पाहून मुले चकित झाली.

कार्यक्रमाची सांगता अर्थातच किरण पुरंदरे यांनी काढलेल्या पक्षांच्या आवाजाने झाली.भारद्वाज, नाचरा, पावश्याचे आवाज ऐकून मुलांनी तसे काढण्याचा प्रयत्न केला. किकच्या विविध शिट्ट्यांचेही अनुकरण केले.

संचालिका माधुरीताई म्हणाल्या,”अशा रंजक कार्यक्रमातून मुलांचे सहजशिक्षण होते. दृक्श्राव्य कार्यक्रमाद्वारे गोष्टी मुलांच्या मनावर ठसतात. यातूनच पुढच्या पिढ्यांना निसर्गाची गोडी लावायचे काम आम्ही करतो.”

बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले तर दीप्ती कौलगुड यांनी आभारप्रदर्शन केले. अनघा पुरंदरे यांनी स्लाईड चे सादरीकरण केले.

किरण पुरंदरे कार्यक्रम सादर करताना,सोबत अनघा पुरंदरे व सौ. माधुरी सहस्रबुद्धे आणि बालचमू

किरण पुरंदरे कार्यक्रम सादर करताना,सोबत अनघा पुरंदरे व सौ. माधुरी सहस्रबुद्धे आणि बालचमू