दिनांक: १४ सप्टेंबर, २०१८
ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बालरंजन केंद्राने “गदिमांना वंदना” हा बहारदार कार्यक्रम सादर केला.भारती निवास सोसायटीच्या गणेशोत्सवाचे हे ४९ वे वर्ष होते तर बालरंजन केंद्राचे त्यात कार्यक्रम करण्याचे ३१वे वर्ष होते.यंदा प्रमुख पाहुणे म्हणून गदिमांचे चिरंजीव श्री.श्रीधर माडगुळकर, त्यांच्या पत्नी माया, मुलगी लीना, जावई आलोक, नातू मृगांक आंबेकर असा सारा माडगुळकर परिवार लाभला होता.
यावेळी श्रीधर माडगुळकर यांनी ह्याच परिसरात व्यतीत केलेल्या त्यांच्या बालपणातील आठवणी जागविल्या.” आमचे बालपण खूपच मुक्त वातावरणात गेले. आज मुलांना नातेवाईक मिळत नाहीत, खेळायला शेजारीपाजारी मित्र नाहीत त्यामुळे मुलांचे बालपण हरवत चालले आहे. अशावेळी बालांचे बालपण जपणाऱ्या आणि इंग्रजी माध्यमात जाणार्या मुलांवर मराठी भाषेचे संस्कार करून त्यांचे भाषाविश्व समृद्ध करणाऱ्या बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांचे कार्य मोलाचे आहे.” असे ते म्हणाले.
नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले,” मुलांसाठी व्यायाम व खेळ आणि त्यातून व्यक्तिमत्व विकास हे केंद्राचे उद्दिष्ट आहे. मात्र मुलांसमवेत काम करताना त्यांच्यामधले अनेक सुप्त गुण मला खुणावू लागले आणि त्यातून या विविधगुणदर्शन कार्यक्रमांची सुरुवात झाली. ‘थीम’ वरचे कार्यक्रम हे केंद्राचे वैशिष्ठ्य आहे. आजवर खेळ, पाऊस, ऋतू, जंगल, घर, शाळा, सण, रंग, गोष्ट, पक्षी, वाहने अशा संकल्पनानवर कार्यक्रम केले. विशेष कवी, साहित्यिक यांच्यापैकी मंगेश पाडगावकर, शांत शेळके, विमल लिमये, सरिता पदकी, गतवर्षी विंदा करंदीकर ही थीम होती.”
यंदा, गदिमांच्या बालसाहित्यापैकी – ‘चांदोबा, चांदोबा भागलास का?, झुकझुक झुकझुक आगीनगाडी, शेपटीवाल्या प्राण्यांची सभा, चंदाराणी, नाच रे मोरा’ सारखी अवीट गोडीची गीते मुलांनी अभिनित केली. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख गाण्यातील राजहंसाने विशेष दाद मिळविली. सुंदर सूत्रात गुंफलेले काव्यसादरीकरण बहारदार झाले. बालनाट्य ‘ शशांक मंजिरी ‘उपस्थितांना भावले. ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ ह्या कोळीगीताने प्रेक्षकांना ठेका धरायला लावला तर गीतरामायणातील ‘सेतू बांधा रे सागरी’ या समूह्गीताने सार्यांना स्फुरण चढले.
यावेळी बालरंजन केंद्राच्या उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. त्यात रमा परांजपे, अक्षय गांधी, प्रतिक सातपुते, द्रुमिल सोवनी, अनीश कुलकर्णी व राधिका भागवत यांचा समावेश होता.
मंजिरी पेठे यांनी कार्याक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन केले. रुपाली वैद्य व दीप्ती रिसबूड या नवीन ताईंचे बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी स्वागत केले.